नांदेड १९ एप्रिल प्रतिनिधी माधव वाघमारे
उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने काकीनाडा टाऊन ते हिसार (हरियाणा) दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील विशेषतः नांदेड विभागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाडीचे वेळापत्रक आणि मार्ग
मिळालेल्या माहितीनुसार, गाडी संख्या ०७७१७ काकीनाडा टाऊन – हिसार एक्सप्रेस मंगळवारी २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०५:४० वाजता काकीनाडा टाऊन येथून सुटेल. ही गाडी विजयवाडा, गुंटूर आणि सिकंदराबाद जवळील चार्लापल्लीमार्गे प्रवास करत रात्री २३:०५ वाजता नांदेड येथे पोहोचेल. त्यानंतर पुर्णा, वसमत, हिंगोली आणि वाशिममार्गे ही गाडी हिसारकडे रवाना होईल.
परतीच्या प्रवासात, गाडी संख्या ०७७१८ हिसार – काकीनाडा टाऊन एक्सप्रेस शुक्रवारी २४ एप्रिल २०२६ रोजी हिसार येथून सुटेल. ही गाडी रविवारी पहाटे ०३:२५ वाजता नांदेड स्थानकावर येईल आणि रात्री २१:३५ वाजता काकीनाडा टाऊनला पोहोचेल.
प्रमुख थांबे
या विशेष गाडीला सामलकोट, राजमहेंद्री, विजयवाडा, गुंटूर, मिर्यालागुडा, नलगोंडा, चार्लापल्ली, मेदचल, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पुर्णा, वसमत, हिंगोली आणि वाशिम या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
गाडीची संरचना
या विशेष ट्रेनला एकूण २४ कोच असतील. यामध्ये:
- AC कोच: ०२ फर्स्ट कम सेकंड एसी (FACCW), ०३ सेकंड एसी (ACCW), ०५ थर्ड एसी (ACCN)
- स्लीपर क्लास: ०८ कोच (CN)
- जनरल कोच: ०४ कोच (GS)
- इतर: ०२ एसएलआर कोच (SLR)
सध्या ही गाडी प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येकी एक फेरी (०१ Trip) पूर्ण करणार आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.











