नांदेड ६ मे प्रतिनिधी | माधव वाघमारे
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने ‘पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियाना’ंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाला गती देण्यासाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे ‘आयुष्यमान १०० डे टीबी कॅम्पियन’ (दुसरा टप्पा) अंतर्गत तीन दिवसीय भव्य आरोग्य शिबिराचा शुभारंभ बुधवारी, ६ मे रोजी करण्यात आला.
प्रशासकीय मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन
हे शिबिर महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त अजितपालसिंग संधु, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत रिठे आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉ. मोहम्मद बदीयोद्दिन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे.
पहिल्याच दिवशी ९० कैद्यांची तपासणी
कारागृहातील कैद्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हे शिबिर ०६ मे ते ०८ मे २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत चालणार आहे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी कारागृहातील ९० कैद्यांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे, संशयित रुग्णांची जागेवरच X-Ray मशीनद्वारे तपासणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून, पहिल्या दिवशी ९० कैद्यांचे एक्स-रे काढण्यात आले आहेत.
प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ तुरुंग अधिकारी विजय मेश्राम, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. मोहम्मद बदीओदिन, खडकपुरा दवाखान्याचे आरोग्य अधिकारी डॉ. रितेश बिशेन, फार्मासिस्ट रंजित पवार, पोलीस कॉन्स्टेबल डोके, क्षयरोग सुपरवायझर राम सोळंके, कार्यक्रम समन्वयक बालाजी साखरे, पांडुरंग दुमाणे, रविंद्र कुमार कावडे, विश्वास साबणे, एक्स-रे तंत्रज्ञ किशोर राठोड आणि ‘साथी’ संस्थेचे राजू गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष पाऊल
पुढील दोन दिवस हे शिबिर सुरू राहणार असून, कारागृहातील सर्व कैद्यांची तपासणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महानगरपालिकेच्या क्षयरोग विभागाचे कर्मचारी, कारागृह प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी आणि आरोग्य सेवकांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. या उपक्रमामुळे कारागृहासारख्या संवेदनशील ठिकाणी क्षयरोगाचे वेळेत निदान होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सोपे होणार आहे.











