नांदेड १२ मे प्रतिनिधी
जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जाणाऱ्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून एका लोखंडी खंजिरसह आणि तलवारीसह तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
नेमकी कारवाई काय?
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दिनांक ११ मे २०२६ रोजी सकाळी ६:०० ते ७:०० वाजेच्या सुमारास नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले:
- तापरे चौक: येथे आरोपी शेख असिफ शेख हशम (वय २३ वर्षे, रा. हिंमतपूर) याला विनापरवाना लोखंडी खंजिर बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले.
- कापूस संशोधन केंद्र (धनेगाव): या परिसरात आरोपी शेख सोहेल शेख अली (वय २५ वर्षे, रा. हिंमतपूर) हा विनापरवाना लोखंडी तलवार बाळगून असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
- सोशल मीडिया मॉनिटरिंग: ‘Manxjeet’ नामक इंस्टाग्राम अकाउंटवरून तलवारीसह फोटो अपलोड करून दहशत निर्माण करणाऱ्या अज्ञात आरोपीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमाल
या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून एक लोखंडी खंजिर आणि एक लोखंडी तलवार जप्त केली आहे. आरोपींविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ४/२५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई
पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव (नांदेड) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, ज्ञानेश्वर मठवाड, वसंत केंद्रे, शंकर माळगे, समीर अहमद, धम्मपाल कांबळे, गोविंद सिरमलवार, संतोष पवार, शेख असिफ आणि विष्णू कल्याणकर यांच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण टीमचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.
बातमी: प्रतिनिधी माधव वाघमारे












