लातूर १५ मे प्रतिनिधी
वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘NEET’ परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवरत सापडली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट नामांकित कोचिंग क्लासेसपर्यंत पोहोचले असून, लातूर येथील RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने (CBI) अटक केली आहे. या कारवाईमुळे केवळ लातूरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमका आरोप काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शिवराज मोटेगावकर यांच्यावर NEET पेपरफुटी प्रकरणात थेट सहभाग असल्याचा संशय आहे. त्यांच्या कोचिंग क्लासेसच्या मॉक टेस्ट (सराव परीक्षा) मधील तब्बल ४२ प्रश्न हे मुख्य NEET परीक्षेतील प्रश्नांशी तंतोतंत जुळत असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. सराव परीक्षेतील प्रश्न मुख्य परीक्षेच्या पेपरशी एवढ्या मोठ्या प्रमाणात जुळणे हा निव्वळ योगायोग नसून, त्यामागे मोठे ‘इन्सायडर नेटवर्क’ असल्याचे बोलले जात आहे.
सीबीआयची मोठी कारवाई
पेपरफुटीच्या तक्रारींनंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून (CBI) अत्यंत गोपनीयरीतीने सुरू होता. तपास यंत्रणांना ‘गेस पेपर रॅकेट’ आणि ‘इन्सायडर नेटवर्क’चे ठोस पुरावे मिळाल्यानंतर लातूरमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली. मोटेगावकर यांच्या अटकेमुळे या रॅकेटमध्ये आणखी किती मोठ्या नावांचा समावेश आहे, हे आता समोर येण्याची शक्यता आहे.
गरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
वर्षानुवर्षे दिवस-रात्र अभ्यास करून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे. जेव्हा नामांकित आणि विश्वासाचे मानले जाणारे क्लासेसच अशा गैरप्रकारात गुंतलेले आढळतात, तेव्हा विद्यार्थ्यांच्या कष्टाचे मूल्य काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पैशांच्या जोरावर पेपर मिळवून देणाऱ्या रॅकेटमुळे खऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना पालकांमधून व्यक्त केली जात आहे.
बातम्यातील मुख्य मुद्दे:
- संचालक अटकेत: RCC कोचिंग क्लासेसचे शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या जाळ्यात.
- प्रश्नांचे साम्य: मॉक टेस्टचे ४२ प्रश्न मुख्य परीक्षेच्या पेपरशी जुळल्याचा आरोप.
- तपास सुरू: इन्सायडर नेटवर्क आणि गेस पेपर रॅकेटचा संशय बळावला.
- पालकांचा संताप: विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी.
वृत्तलेखन: माधव वाघमारे












