नांदेड १९ मे प्रतिनिधी, माधव वाघमारे
जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी एका मोठ्या जुगार अड्ड्यावर धाडसी छापा टाकून पाच आरोपींना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य, रोकड, मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण २ लाख २२ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे रचला सापळा
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंजेगाव शिवारात पाण्याच्या टाकीजवळ काही लोक बेकायदेशीरपणे जुगार खेळत असल्याची अत्यंत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दिनांक १८ मे २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकण्यासाठी सापळा रचला.
५ आरोपींना अटक; मुद्देमाल जप्त
पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात जुगार खेळत असलेल्या पाच जणांना जागीच ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) साईनाथ हिरामन बाऊलकर (वय ३५ वर्ष, व्यवसाय: चालक, रा. लालवाडी फत्तेपूर, ता. जि. नांदेड)
२) मुगाजी सारंग संगेकर (वय ३२ वर्ष, व्यवसाय: शेती, रा. लालवाडी फत्तेपूर, ता. जि. नांदेड)
३) रवि उत्तमराव पंचलिंग (वय ३२ वर्ष, व्यवसाय: चालक, रा. लालवाडी फत्तेपूर, ता. जि. नांदेड)
४) देवानंद व्यंकटी झंझारे (वय २६ वर्ष, व्यवसाय: चालक, रा. इंजेगाव, ता. जि. नांदेड)
५) प्रकाश राम गिरी (वय ५५ वर्ष, व्यवसाय: शेती, रा. पुयडवाडी, ता. जि. नांदेड)
कारवाईदरम्यान आरोपींच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य, नगदी रोकड, ४ मोबाईल फोन आणि २ मोटारसायकल असा एकूण २,२२,२६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५८२/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोकॉ/३२२४ समीर अहमद शब्बीर अहमद यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कामगिरी
सदर यशस्वी कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, भोकरच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि इतवारा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, पोलीस कर्मचारी वसंत केंद्रे, मारोती पचलींग, धम्मपाल कांबळे, शंकर माळगे आणि समीर अहमद यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
या धडक कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कारवाई करणाऱ्या संपूर्ण पोलीस अधिकारी व अंमलदारांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आहे. या कारवाईमुळे नांदेडमधील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.












