नांदेड २२ जून प्रतिनिधी
नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या, आरडाओरड करून शांतता भंग करणाऱ्या आणि महिला व नागरिकांना त्रास देणाऱ्या १४ हुल्लडबाजांवर नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह’ आणि ‘दामिनी पथका’ने २२ जून २०२६ रोजी शहराच्या विविध भागांत ही धडक मोहीम राबवली. या सर्व आरोपींवर मुंबई पोलीस कायदा (मपोका) कलम ११०/११७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या सूचनेनुसार विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक एन. जी. पोमनळकर व चॉर्ली पोलीस अंमलदारांनी शहरात ठिकठिकाणी पेट्रोलिंग करून ही कारवाई केली.
विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेली कारवाई खालीलप्रमाणे:
- भाग्यनगर परिसर: चॉर्ली क्रमांक १, २ आणि ३ च्या पथकाने भगीरथ नगर, जिरायत मैदान आणि सत्कार वाईन शॉप परिसरात पेट्रोलिंग दरम्यान सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून शांतता भंग करणाऱ्या ३ इसमांना ताब्यात घेतले. तसेच हद्दीतील दारूची दुकाने, वाईन शॉप, हॉटेल्स आणि शाळा-कॉलेज परिसराची तपासणी केली.
- इतवारा (जुना मोंढा): मॅपको रोड आणि जुना मोंढा भागात चॉर्ली क्रमांक २ व ३ च्या पथकाने सर्वाधिक म्हणजेच ५ जणांवर सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घातल्याप्रकरणी कारवाई केली.
- दामिनी पथकाची कारवाई: महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दामिनी पथकाने वृंदावन कॉलनी आणि विसावा गार्डन परिसरात आरडाओरड करणाऱ्या ३ हुल्लडबाजांना रंगेहात पकडले. त्यांच्यावर शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले.
- शिवाजीनगर: अण्णाभाऊ साठे चौक येथे सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या १ इसमावर कारवाई करण्यात आली.
- विमानतळ हद्द: सांगवी परिसरात मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या १ इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
- वजिराबाद: न्यायालय परिसर आणि परिसरात चॉर्ली क्रमांक २ च्या अंमलदारांनी १ इसमावर कारवाई केली.
पोलीस अधीक्षकांचे कडक आवाहन:
“नांदेड शहरात कोणीही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करू नये. तसेच दारू पिणाऱ्यांसाठी बेकायदेशीरपणे जागा उपलब्ध करून देणाऱ्यांवरही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी दिला आहे.या कारवाईमुळे नांदेडमधील टवाळखोर आणि मद्यपींचे धाबे दणाणले असून, नागरिकांनी विशेषतः महिलांनी पोलिसांच्या या धडक मोहिमेचे स्वागत केले आहे.
विशेष प्रतिनिधी, माधव वाघमारे











