नांदेड ३ जुलै प्रतिनिधी
लिंबगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि लिंबगाव पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेली बॅग आणि त्यातील ३ किलो चांदीच्या दागिन्यांसह एकूण ६ लाख ८१ हजार रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मालेगाव रोड परिसरात रचला सापळा
दिनांक ३ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, लिंबगाव येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हे मालेगाव रोड परिसरात येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवत मालेगाव रोड परिसरात सापळा रचला आणि संशयितांना ताब्यात घेतले.
आरोपींची नावे आणि पार्श्वभूमी
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे खालीलप्रमाणे सांगितली:
१) अक्षय चंद्रकांत कुलथे (वय २१ वर्ष, रा. झेंडा चौक वसमत, जिल्हा हिंगोली) – मुख्य आरोपी
२) साहिल ओंकार केंजकर (वय १९ वर्ष, रा. सन्मित्र कॉलनी, नांदेड)
३) गोपाल विवेक रापतवार (वय २१ वर्ष, रा. सोमवारपेठ, वसमत, जिल्हा हिंगोली)
४) एक विधीसंघर्ष बालक (नाबालिक)
सखोल चौकशी दरम्यान आरोपींनी लिंबगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्र. ७८/२०२६, कलम ३०९(४), ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्ह्याची कबुली दिली आहे.
जुन्या वादातून रचला होता कट
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या वडिलांसोबत झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून मुख्य आरोपी अक्षय चंद्रकांत कुलथे याने आपल्या साथीदारांसह हा कट रचला होता. २९ जून २०२६ रोजी रात्री ८:०० वाजताच्या सुमारास शिवम बार परिसरात फिर्यादीची दिशाभूल करून, त्याच्या जवळील बॅग हिसकावून नेण्यात आली होती. या बॅगेत अंदाजे ३ किलो वजनाचे चांदीचे दागिने होते, ज्यांची एकूण किंमत ६,८१,०००/- रुपये आहे. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
पोलीस पथकाची यशस्वी कामगिरी
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत खालील अधिकारी व अंमलदारांचा सहभाग होता:
- स्थानिक गुन्हे शाखा (LCB): पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोउनि मिलिंद सोनकांबळे, पोहेकॉ रविशंकर बामणे, रितेश कुलथे, पोकॉ चंद्रकांत स्वामी, अझरुद्दीन शेख आणि अनिल बिरादार.
- लिंबगाव पोलीस स्टेशन: सपोनि बोधनकर, पोह रितेश टाक, प्रदिप गर्दनमारे आणि बालाजी तेलंग.
– विशेष प्रतिनिधी, माधव वाघमारे












