नांदेड ४ जुलै प्रतिनिधी
जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात नांदेड पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर जरब बसवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून इस्लापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने एका मोठ्या कारवाईत १,३४,८८२/- रुपये किमतीच्या मुद्देमालासह एका आरोपीला रंगेहात पकडले आहे.
हुंडी ते तोटंबा मार्गावर रचला सापळा
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक ०३/०७/२०२६ रोजी इस्लापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने हुंडी ते तोटंबा मार्गावरील नाल्याजवळ अत्यंत गुप्ततेने सापळा रचला. यावेळी संशयास्पद वाटलेल्या एका रॉयल एनफील्ड (Royal Enfield) मोटारसायकलला (क्रमांक MH-26-DB-1374) अडवून त्याची झडती घेण्यात आली. या तपासणी दरम्यान मोटारसायकलवरून प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू बेकायदेशीररी्या वाहतूक करून विक्रीसाठी नेत असल्याचे उघडकीस आले.
१ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपन्यांचा गुटखा व सुगंधित तंबाखू (किंमत ₹५४,८८२/-) आणि गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरलेली रॉयल एनफील्ड मोटारसायकल (किंमत ₹८०,०००/-) असा एकूण १,३४,८८२/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपी दिपक गणेश आलडवाड (वय ३० वर्षे, रा. किनवट) याच्याविरुद्ध इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 84/2026, कलम १२३, २७४, २७५ भारतीय न्याय संहिता (BNS) सह कलम २६, २७, ३०(२)(अ) अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
या पथकाने केली कारवाई
सदरची धडक कारवाई मा. श्री. डॉ. नीलाभ रोहन (पोलीस अधीक्षक, नांदेड), सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मपोउपनि/ कागणे व पोकॉ/ नागरगोजे, साखरे (सर्व नेमणूक इस्लापूर पोलीस स्टेशन) यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
नांदेड पोलिसांचे नागरिकांना आवाहन:
नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात कुठेही प्रतिबंधित गुटखा, पान मसाला किंवा सुगंधित तंबाखूची अवैध विक्री, साठवणूक अथवा वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी. अशा बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध पोलिसांची कठोर कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.वृत्त संकलन व संपादन:
प्रतिनिधी: माधव वाघमारे












