नांदेड ५ जुलै (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत चोरीला गेलेला मौल्यवान मारवाडी जातीचा घोडा अवघ्या दोन दिवसांत हस्तगत केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, चोरीला गेलेला घोडा मूळ मालकाच्या स्वाधीन केला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर राघवेंद्र शिवाजीराव कुलकर्णी (वय ३९ वर्षे, रा. रवीनगर, नांदेड) यांचा अंदाजे ८०,००0/- रुपये किमतीचा मारवाडी जातीचा घोडा १९ जून २०२६ रोजी रात्री जिरायत मैदान परिसरातून अज्ञात चोरांनी चोरून नेला होता. या संदर्भात डॉक्टर कुलकर्णी यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसात गुरन ३४२/२०२६ कलम ३०३(२), ३(५) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मा.श्री. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने तपास चक्र फिरवली. तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि) नरेश वाडेवाले यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषण तसेच परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या मदतीने पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला.
पोलिसांनी या कारवाईत शेख अदिन शेख यासीन (वय २० वर्षे, व्यवसाय: खाजगी नोकरी, रा. लेबर कॉलनी, नांदेड) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला (ताब्यात घेतलेला अल्पवयीन मुलगा) यशस्वीरित्या ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गेलेला मारवाडी घोडा जप्त करून तो मूळ मालक डॉ. राघवेंद्र कुलकर्णी यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
या पथकाने केली यशस्वी कारवाई:
सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा.श्री. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. संतोष तांबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश माळी, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले, पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख, पोहेकॉ. विशाल माळवे, पोकॉ. अदनान पठाण, पोकॉ. विष्णुकान्त मुंडे, पोकॉ. राजीव घुले, पोकॉ. राहुल लाठकर, पोकॉ. नागनाथ चापके, पोकॉ. सुधाकर मरदोडे आणि पोकॉ. अंकुश कांबळे (सर्व नेमणूक पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड) यांनी अत्यंत चातुर्याने व यशस्वीरित्या पार पाडली. पोलिसांच्या या जलद कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.












