नांदेड / भोकर ६ जुलै (प्रतिनिधी माधव वाघमारे)
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या राज्यभर मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवला जात आहे. या अंतर्गत भोकर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पूर्णपणे त्रुटीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी स्वतः मतदारांच्या घरांना प्रत्यक्ष भेटी देत पाहणी केली आणि नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर तालुका मतदारसंघात ही मोहीम अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार यादीत नोंद करणे, मृत किंवा कायमचे स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे यादीतून वगळून ती अद्ययावत करणे, तसेच मतदारांच्या संपूर्ण तपशीलाची पडताळणी करून त्याचे डिजिटायझेशन करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
तहसीलदारांकडून प्रत्यक्ष गणना फॉर्मची पडताळणी आणि डिजिटायझेशन
या विशेष मोहिमेदरम्यान तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी वाकद येथील एका स्थानिक नागरिकाच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी तेथील मतदाराचा गणना फॉर्म स्वतः भरून घेतला आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून त्याचे जागीच तत्काळ डिजिटायझेशन करून संपूर्ण प्रक्रियेची प्रत्यक्ष खात्री केली. प्रशासकीय अधिकारी स्वतः दारात आल्याने नागरिकांमध्येही या मोहिमेबद्दल सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले.
मर्यादित कालावधी; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
या मोहिमेची माहिती देताना तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी सांगितले की,
“मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण हा केवळ एक प्रशासकीय कार्यक्रम नसून आपली लोकशाही अधिक बळकट आणि सक्षम करण्याचा एक पाया आहे. प्रत्येक पात्र मतदाराचे नाव यादीत असणे हा त्याचा हक्क आहे आणि ती यादी त्रुटीमुक्त ठेवणे हे आपले कर्तव्य आहे.
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, या विशेष मोहिमेसाठीचा कालावधी अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे जेव्हा ‘बीएलओ’ (Block Level Officer) नागरिकांच्या घरी भेट देतील, तेव्हा प्रत्येक पात्र मतदाराने स्वतःचा आणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा गणना फॉर्म वेळेत भरून द्यावा. तसेच आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करून देऊन बीएलओमार्फत त्याचे तत्काळ डिजिटायझेशन करून घ्यावे, जेणेकरून भविष्यात मतदानापासून कोणीही वंचित राहणार नाही. नागरिकांनी या राष्ट्रीय कामात प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.












