नांदेड ६ जुलै (विशेष प्रतिनिधी)
नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम तीव्र करण्यात आली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून देगलूर पोलीस ठाण्याच्या पथकाने रविवारी, ५ जुलै २०२६ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे मौजे इब्राहिमपूर (ता. देगलूर) येथे धडक छापा टाकून एका अवैध गुटखा विक्रेत्यावर मोठी कारवाई केली आहे.
दुकनातून मुद्देमाल हस्तगत
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, पोलिसांनी इब्राहिमपूर येथील आरोपी शिवाजी आकाश इंगळे (वय ३५ वर्षे, रा. इब्राहिमपूर, ता. देगलूर) याच्या दुकानावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान त्याच्या दुकानात विक्रीसाठी लपवून ठेवलेला तब्बल १०,२१५ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपीविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२४/2026 अन्वये नवीन कायद्यानुसार ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) तसेच ‘अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६’ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
कारवाई करणारे पोलीस पथक
ही यशस्वी कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, आणि पोलीस अंमलदार अशोक घुमे, नामदेव शिरोळे, ओमप्रकाश डिडेवार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन!
नांदेड जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जिल्ह्यात कुठेही प्रतिबंधित गुटखा, पान मसाला किंवा सुगंधित तंबाखूची विक्री, साठवणूक अथवा वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. अशा बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध यापुढेही कठोर मोहीम सातत्याने सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
वृत्त संकलन: प्रतिनिधी माधव वाघमारे












