नांदेड २२ जुलै प्रतिनिधी
अनुसूचित जाती (SC) प्रवर्गाला मिळणाऱ्या १३ टक्के आरक्षणाचा अपेक्षित लाभ मातंग समाजापर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे मातंग समाजाला त्यांचे हक्क, अधिकार आणि योग्य प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाचे तात्काळ उपवर्गीकरण करावे, अशी ठाम मागणी ‘जय राजासाहेब कृती समिती’चे नांदेड जिल्हाध्यक्ष महेंद्र माधवराव भटलाडे यांनी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन पाठवून ही मागणी लावून धरण्यात आली आहे.
सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकूण १३ टक्के आरक्षण लागू असूनही मातंग समाजाला हवे तेवढे अधिकार, हक्क आणि जागा मिळालेल्या नाहीत. समाज आजवर आपल्या न्याय्य हक्कांपासून वंचित राहिला आहे. त्यामुळे SC प्रवर्गाचे उपवर्गीकरण करून मातंग समाजाचा स्वतंत्र हिस्सा निश्चित करण्यात यावा, जेणेकरून राज्यातील संपूर्ण मातंग समाजाला शैक्षणिक, सामाजिक व शासकीय सेवांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळू शकेल.
या निवेदनाची प्रत महाराष्ट्राच्या महामहीम राज्यपालांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे. मातंग समाजाच्या या प्रलंबित आणि महत्त्वाच्या मागणीवर राज्य सरकार तात्काळ सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा जय राजासाहेब कृती समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
बातमी संकलन: प्रतिनिधी माधव वाघमारे












