नांदेड ३१ जुलै ( प्रतिनिधी – माधव वाघमारे)
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची (उमेद) जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून दिलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वयाने कामांना गती द्यावी, असे स्पष्ट निर्देश नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) महेश पाटील यांनी दिले.
नांदेड जिल्हा परिषदेत गुरुवारी (दिनांक ३० जुलै) मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’अंतर्गत चालणाऱ्या विविध योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक राजकुमार मुक्कावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
महत्त्वाचे निर्देश आणि निर्णय :
- बँक कर्ज व स्लिप-बॅक एन्ट्री : लखपती दीदी उपक्रमांतर्गत ‘स्लिप-बॅक एन्ट्री’चे काम तातडीने पूर्ण करावे. स्वयंसहाय्यता बचत गटांचे बँक कर्ज प्रस्ताव वेळेत बँकांकडे सादर केले जावेत. यासाठी तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांनी ‘तालुकास्तरीय बँकर्स समिती’ (BLBC) बैठकांना नियमित उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
- उद्योग योजनांचे प्रस्ताव : पीएमईजीपी (PMEGP) आणि सीएमईजीपी (CMEGP) योजनांचे सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीने जिल्हा उद्योग केंद्राकडे (DIC) पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
- समूह बांधणी व नोंदणी : येत्या सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत समूह बांधणीचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच प्रभाग संघांचे (Cluster Federations) प्रस्ताव येत्या आठवड्याभरात धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे सादर करून त्यांना त्वरित मंजुरी मिळवून घ्यावी.
- ई-केवायसी व निधी प्रस्ताव : सर्व समूह सदस्यांची ई-केवायसी (e-KYC) आणि आधार पडताळणी निर्धारित वेळेत पूर्ण करावी. यासोबतच RF, CIF, VRF, MKSP आणि OSF या विविध निधींचे प्रस्ताव वेळेत जिल्हा कक्षाकडे सादर करावेत, असे निर्देशही सीईओ पाटील यांनी दिले.
या आढावा बैठकीस प्रभारी प्रकल्प संचालक राजकुमार मुक्कावार, जिल्हा अभियान व्यवस्थापक द्वारकादास राठोड, जिल्हा व्यवस्थापक गणेश कवडेवार, बालप्रसाद जंगिलवाड, माधव भिसे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक आणि प्रभाग समन्वयक उपस्थित होते.












