नांदेड १ ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी)
ड्रायव्हरच्या कामाचे आमिष दाखवून एका व्यक्तीला एकांतात बोलावून घेत, त्याचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ काढून १ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या आणि सोन्याची अंगठी हिसकावून घेणाऱ्या एका सराईत टोळीचा भाग्यानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेसह ५ आरोपींना अवघ्या काही तासांत अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण ५,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
नांदेड शहरातील एका व्यक्तीला ३१ जुलै २०२६ रोजी एका महिलेने मोबाईलवर संपर्क साधून ‘ड्रायव्हरची आवश्यकता आहे’ असे सांगून भाग्यानगर येथील ढवळे कॉर्नर जवळ, बेलानगर परिसरात बोलावून घेतले. फिर्यादी घटनास्थळी पोहोचल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या महिलेसह इतर तीन महिलांनी व एका पुरुषाने त्यांना बोलण्यात गुंतवून जवळील एका घरात नेले.
घरात नेल्यानंतर आरोपींनी फिर्यादीचे हात पकडून जबरदस्तीने त्यांच्या अंगावरील शर्ट काढून बनियानवरचे मोबाईलद्वारे फोटो आणि व्हिडिओ चित्रित केले. त्यानंतर आरोपींनी हे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची, तसेच खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ₹१,००,०००/- ची खंडणी मागितली. एवढेच नव्हे तर फिर्यादीच्या हातातील सुमारे ८ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत ₹१,२०,०००/-) जबरदस्तीने काढून घेतली व जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पसार झाले.
गुन्हा दाखल आणि त्वरित कारवाई
या घटनेनंतर घाबरलेल्या फिर्यादीने भाग्यानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीवरून गुन्हा क्र. 405/2026 कलम ३१०(२), ३०८(३), ३५१(२), ३५२ भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने भाग्यानगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष तांबे यांच्या नेतृत्वात पोउपनि/ विनोद देशमुख व गुन्हे शोध पथकाने तपासाची सूत्रे वेगाने हलवली. तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत सर्व पाचही आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१) शिला सुनील भदरगे (वय ३९ वर्षे, रा. बेलानगर, नांदेड)
२) इंदुबाई विठ्ठलराव बान्हाटे (वय ५५ वर्षे, रा. संतोष नगर, नांदेड)
३) सुनिता रामकांत सोनकांबळे (वय ५५ वर्षे, रा. सप्तगिरी कॉलनी, नांदेड)
४) रेखा रामचंद्र इंगोले (वय ४५ वर्षे, रा. देगावचाळ, नांदेड)
५) अमन मारोती कांबळे (वय २२ वर्षे, रा. पालीनगर, नांदेड)
साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला आणि लुटलेला एकूण ₹५,५०,०००/- चा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये:
- दोन स्कुटी वाहने (अंदाजे किंमत ₹१,५०,०००/-)
- विविध कंपन्यांचे ४ मोबाईल फोन (अंदाजे किंमत ₹८०,०००/-)
- एक तीन चाकी ऑटो (अंदाजे किंमत ₹२,००,०००/-)
- ८ ग्रॅम सोन्याची अंगठी (अंदाजे किंमत ₹१,२०,०००/-)
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख हे करत आहेत.
तपास पथक
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस उपअधिक्षक रामेश्वर वैजने (नांदेड शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश माळी, पोउपनि विनोद देशमुख, पोउपनि नरेश वाडेवाले आणि पोलीस अंमलदार विशाल माळवे, विष्णुकांत मुंढे, सुधारकर मलदोडे, राजीव घुले, नागनाथ चापके, राहुल लाठकर, हेड कॉ सविता केळगंद्रे आदनान पठाण, अंकुश कांबळे, व्यंकटेश सांगुलवार (सर्व नेमणूक पोलीस स्टेशन भाग्यानगर) यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
नांदेड पोलिसांचे नागरिकांना आवाहन:
“अनोळखी व्यक्तींकडून नोकरी, व्यावसायिक व्यवहार किंवा इतर कोणत्याही कारणासाठी एकांतात बोलावल्यास पुरेशी शहानिशा व खातरजमा करावी. सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्यास घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी किंवा 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा.”
विशेष सूचना: नमूद आरोपींनी अशाच प्रकारे अनेकांना लुबाडल्याची शक्यता आहे. जर कोणाची अशी फसवणूक झाली असेल, तर त्यांनी तात्काळ भाग्यानगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, त्यांची नावे गोपनीय ठेवली जातील.बातमी संकलन: प्रतिनिधी माधव वाघमारे












