बीड/ ५ ऑगस्ट प्रतिनिधी
एमपीएससी (MPSC) परीक्षेत यश मिळवून टोकाचा रुबाब अनुभवणाऱ्या, पण नंतर भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकलेल्या वन अधिकारी श्रीनिवास लखमावाडची अखेर पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत (तुरुंगात) रवानगी करण्यात आली आहे. जेलमध्ये रवानगी करतानाचा त्याचा फोटो सध्या प्रशासकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे.
काही दिवसांपूर्वीपर्यंत ज्या अधिकाऱ्याच्या पुढे-मागे शासकीय कर्मचाऱ्यांचा गराडा असायचा, आलिशान सरकारी गाडी, प्रोटोकॉल, सुरक्षारक्षक आणि समाजात मोठा मान-सन्मान मिळायचा; तोच अधिकारी आज अत्यंत केविलवाण्या अवस्थेत पाहायला मिळाला. हातामध्ये एक साधी प्लास्टिकची कॅरीबॅग आणि पाठीवर बॅग अडकवून, पोलीस कर्मचाऱ्यांच्या गराड्यात कारागृहाची पायरी चढतानाचा त्याचा अवतार प्रशासकीय व्यवस्थेला मोठा इशारा देऊन जातो.
रुबाब संपला, पश्चातापाची वेळ सुरू
स्पर्धा परीक्षेत राज्यात अव्वल स्थान मिळवून शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर मिळालेल्या पदाचा आणि अधिकाराचा योग्य वापर करण्याऐवजी, लाचेची चटक लागल्याने लखमावाड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकला. ज्या हातांनी कधी प्रशासकीय फायलींवर स्वाक्षऱ्या करून आदेश दिले जायचे, त्याच हातांत आज साहित्याची पिशवी धरून त्याला कैद्यासारखे चालावे लागत आहे.
सरकारी नोकरीतील तो थाटमाट, आलिशान गाड्यांचा ताफा आणि कर्मचाऱ्यांचा ‘जी हुजूर’ असा शब्द आता भूतकाळ जमा झाला आहे. पोलीस ठाणे आणि तुरुंगात मिळणारी साधी, शिस्तबद्ध आणि कठोर वागणूक, तसेच कारागृहात इतर कैद्यांकडून मिळणारा अनुभव यामुळे लखमावाडला आपल्या कृत्याचा प्रचंड पश्चाताप होत असल्याचे त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून स्पष्ट दिसत आहे.
यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही भ्रष्टाचाराचा मार्ग निवडल्यास त्याचा शेवट असाच अत्यंत क्लेशदायक आणि अपमानकारक होतो, हेच श्रीनिवास लखमावाडच्या या चित्रावरून स्पष्ट होत आहे.












