नांदेड ७ जुलै (विशेष प्रतिनिधी – माधव वाघमारे)
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको-हडको क्षेत्रीय कार्यालय क्र.०६ अंतर्गत येणाऱ्या विविध गंभीर नागरी समस्यांवर नागरिकांना तात्काळ दिलासा देण्यासाठी महापौर सौ. कविता संतोष मुळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ०७ ऑगस्ट) आढावा बैठक पार पडली. पाणी पुरवठा, स्वच्छता, मलनिस्सारण, रस्ते आणि पथदिवे यांसारख्या मूलभूत सुविधांच्या ढिसाळ कारभारावरून बैठकीत लोकप्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी केवळ कागदावर अहवाल न दाखवता प्रत्यक्ष जमिनीवर काम करून दाखवावे, अन्यथा प्रशासकीय दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशारा महापौरांनी यावेळी दिला.
या बैठकीला स्थानिक नगरसेवक संजिव घोगरे, संजय मोरे, अभिषेक सौदे, काळे पाटील, काकडे, महापौर प्रतिनिधी संतोषभाऊ मुळे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, निलेश सुंकेवार, उपायुक्त नितीन गाढवे, शहर अभियंता सुमंत पाटील, सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादेक, उपअभियंता प्रकाश कांबळे, उपअभियंता सतीश ढवळे, क्षेत्रिय अधिकारी डॉ. मिर्झा बेग आणि कनिष्ठ अभियंता ठाणेदार यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व दिलेले निर्देश:
- पाणी पुरवठा व नवीन लाईन: सिडको-हडको भागात होणाऱ्या विस्कळीत व उशिरा होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नगरसेवक आक्रमक झाले होते. वाढत्या लोकवस्तीचा विचार करता नवीन पाणी पुरवठा लाईन टाकण्याची मागणी नगरसेवकांनी केली. यावर महापौरांनी मुख्य जलवाहिन्यांची गळती शोधून तात्काळ दुरुस्ती मोहीम राबवण्याचे व नगरसेवकांशी समन्वय साधून नवीन लाईनचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
- मलनिस्सारण व गटारे: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तुंबलेल्या मलनिस्सारण वाहिन्या आणि गटारांची स्वच्छता प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
- स्वच्छता व घंटागाडी: सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता व मनुष्यबळ वाढवण्याच्या मागणीवर महापौरांनी अंतर्गत रस्त्यांवरील कचरा दररोज वेळेवर उचलणे, प्रत्येक गल्लीत नियमित घंटागाडी पाठवणे आणि ओला-सुका कचरा वर्गीकरण करून घेण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले.
- रस्ते दुरुस्ती व बांधकाम दर्जा: सिडको-हडकोतील खराब रस्ते आणि खड्डे तात्काळ बुजवून प्रवास सुरक्षित करावा. अपूर्ण रस्त्यांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करताना कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करू नये. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर थेट कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
- पथदिवे व सुरक्षितता: बंद असलेले पथदिवे तात्काळ सुरू करून नवीन तंत्रज्ञानाचे LED दिवे बसवण्याच्या कामाला गती द्यावी, जेणेकरून रात्रीच्या वेळी नागरिकांची सुरक्षितता कायम राहील.
लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या नागरी समस्यांची गंभीर दखल घेत महापौरांनी प्रशासनाला कामाचा प्रत्यक्ष प्रगती अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत.











