प्रतिनिधी : माधव वाघमारे नांदेड (दि. ८ ऑगस्ट २०२६)
जिल्हा परिषदेचे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली व बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीची टप्प्याटप्प्याने प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी प्रशासकीय कामकाज व आगामी विकास योजनांबाबत खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले:
- तीन टप्प्यांत ई-ऑफिस प्रणाली: गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्हा परिषदेत ई-ऑफिसची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आतापर्यंत सुमारे ३,६०० पत्रांचे स्कॅनिंग करून ई-प्रणालीद्वारे कार्यवाही करण्यात आली आहे. प्रथम टप्प्यात मुख्यालय, दुसऱ्या टप्प्यात तालुकास्तर आणि तिसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायत स्तरावर ही प्रणाली लागू केली जाईल. यामुळे फाइल्स आणि तक्रारींचा अचूक मागोवा घेता येऊन कामांचा जलद निपटारा होईल.
- वेतनाशी जोडणार बायोमेट्रिक उपस्थिती: कार्यालयीन शिस्त आणि वेळेचे पालन सुधारावे यासाठी बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली सुरू केली जाणार आहे. भविष्यात कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवून ही प्रणाली थेट वेतन प्रक्रियेशी जोडली जाईल.
- घरकूल बांधकामाला गती: महेश पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या एका महिन्यात १२,६२७ घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात यश आले आहे.
- घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन: ग्रामपंचायतींमध्ये सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाला विशेष प्राधान्य दिले जाईल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कचऱ्याचे विलगीकरण व वर्गीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर व्यापक जनजागृती केली जाईल.
- विविध विभागांचे अभिसरण: आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन आणि ‘उमेद’ अभियानाच्या अभिसरणातून (Convergence) विविध विकास उपक्रम राबवले जातील. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत नांदेड जिल्ह्याला राज्याच्या आघाडीच्या टक्केवारीच्या बरोबरीने आणण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.












