२६ ऑगस्ट (प्रतिनिधी: माधव वाघमारे)
नांदेड सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या नराधम आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांच्या आत अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे. विलास पंडित वाघमारे (वय ३० वर्षे, रा. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या घरासमोर खेळत असताना, आरोपी विलास वाघमारे याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून जवळ बोलावून घेतले. सुमारे २० ते २५ मिनिटांनी मुलगी रडत घरी परतल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी विचारपूस केली असता, आरोपीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. या घटनेप्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २०२/२०२६, कलम ६४(२)(f), ६५(२) भारतीय न्याय संहिता (BNS) सह कलम ४, ५(M), ५(N), ६ POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शोधमोहीम अन् पालम येथून आरोपीला अटक घटनेचे गांभीर्य ओळखून नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तातडीने सोनखेड, लोहा, माळाकोळी, कंधार आणि अहमदपूर (जि. लातूर) परिसरात शोधमोहीम राबवली.
तपासादरम्यान गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी पालम (जि. परभणी) येथील शिरसकर स्मशानभूमी परिसरातील झाडा-झुडपांत लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने २५ ऑगस्ट २०२६ रोजी घटनास्थळी धाड टाकून आरोपी विलास वाघमारे यास शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यास पुढील कायदेशीर कारवाईसाठी सोनखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस पथकाची कामगिरी ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील (भोकर) व अप्पर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुरव (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली सोनखेड पोलिस स्टेशन प्रभारी API विठ्ठल नागरगोजे व त्यांचा पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे, पोउनि मिलिंद सोनकांबळे, पोउनि महेश कोरे, पोउनि माधव केंद्रे, पोउनि बळीराम दासरे, तसेच अंमलदार देविदास चव्हाण, दिलीप चंचलवार, मोतीराम पवार, सिद्धार्थ सोनसळे, रवि बामने, चंद्रकांत स्वामी, अझहर शेख, अनिल बिरादार, श्रीराम दासरे, संघरत्न गायकवाड, मनोज राठोड, सुधाकर देवकत्ते आणि सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर, दीपक ओढणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.












