नांदेड २५ ऑगस्ट (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ‘टू प्लस योजने’अंतर्गत वजीराबाद भागातील सराईत गुन्हेगार किसन राजू कुरील याच्यावर एमपीडीए (MPDA) कायद्यान्वये कारवाई करून त्याला एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. चालू वर्ष २०२६ मधील नांदेड पोलिसांची ही १६ वी स्थानबद्धतेची कारवाई ठरली आहे.
गंभीर गुन्ह्यांची नोंद आणि सवय न सुधारल्याने कारवाई स्थानबद्ध करण्यात आलेला आरोपी किसन राजू कुरील (वय- बेकार, रा. गायत्री मंदिराजवळ, वजीराबाद, नांदेड) याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणे व त्याचा वापर करणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी आणि दरोडा यांसारख्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची पोलीस ठाण्यात नोंद आहे. यापूर्वी त्याच्यावर विविध प्रतिबंधात्मक कारवाया करूनही त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नव्हता. त्यामुळे प्रभारी अधिकारी, पोलीस ठाणे वजीराबाद यांनी त्याच्याविरुद्ध MPDA अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाची कायदेशीर पूर्तता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी केली.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश अन् छत्रपती संभाजीनगर कारागृहात रवानगी पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या शिफारसीवरून नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मा. श्री. राहुल कर्डिले यांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी किसन कुरील याला MPDA कायद्यांतर्गत एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले. आदेश प्राप्त होताच पोलिसांनी तत्काळ अंमलबजावणी करत आरोपीला छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहात रवाना केले आहे.
नांदेड पोलिसांची दमदार कामगिरी:
- चालू वर्षातील स्थानबद्धता: सन २०२६ या वर्षात आतापर्यंत एकूण १६ सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.
- प्रतिबंधात्मक कारवाया: १५० पेक्षा अधिक सराईत गुन्हेगारांच्या अभिलेखानुसार त्यांच्यावर विविध कायद्यांन्वये प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित आहे.
“सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या आणि वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहणार असून, सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल.” — पोलीस प्रशासन, नांदेड












