नांदेड ९ सप्टेंबर (विशेष प्रतिनिधी – माधव वाघमारे) विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली असून या टप्प्यात प्राप्त होणारे दावे व हरकती यांची काटेकोरपणे पडताळणी करून त्यांचा तातडीने व नियमानुसार निपटारा करावा. “जिल्ह्यातील एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही आणि अपात्र अथवा चुकीची नोंद असलेला मतदार यादीत राहणार नाही,” याची सर्व मतदार नोंदणी अधिकारी (ERO) आणि सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी (AERO) पूर्ण दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) सभागृहात आयोजित मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहायक जिल्हाधिकारी बी. सरवनन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हणमंत कोळेकर यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्याचे यश आणि पुढील दिशा पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी कर्डिले यांनी अधिकारी, पर्यवेक्षक व बीएलओ (BLO) यांचे अभिनंदन केले. जुन्या यादीतून कोणताही पात्र मतदार चुकून वगळला गेला असल्यास त्याच्याकडून फॉर्म क्र. ६ भरून घेऊन योग्य पडताळणीअंती नोंदणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्य मार्गदर्शक मुद्दे व सूचना:
- सुनावणी व पारदर्शकता: बीएलओच्या पंचनाम्याद्वारे त्रुटी दुरुस्त कराव्यात. आवश्यकतेनुसार व्हॉट्सॲप किंवा प्रत्यक्ष नोटीस देऊन सुनावणी घ्यावी.
- फॉर्म ७ व ८ वर विशेष लक्ष: नाव वगळणी (फॉर्म ७) आणि दुरुस्ती/स्थलांतर (फॉर्म ८) बाबत निर्णय घेताना विशेष काळजी घ्यावी.
- राजकीय पक्षांचा सहभाग: प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही पुनरिक्षण प्रक्रियेची माहिती द्यावी.
- कारवाईचा इशारा: पुनरिक्षण कामात कोणतीही अनियमितता किंवा गंभीर चूक आढळल्यास कठोर कारवाईसह आवश्यकतेनुसार एफआयआर (FIR) दाखल करण्याचा इशारा देण्यात आला.
- नवीन मतदार नोंदणी: वंचित राहिलेल्या पात्र नागरिकांची माहिती घेऊन त्यांचे फॉर्म ६ भरून घेण्यावर विशेष भर देण्याचे आदेश त्यांनी दिले.
प्रशिक्षणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन प्रशिक्षण सत्रात उपजिल्हाधिकारी हणमंत कोळेकर यांनी सादरीकरणाद्वारे (Presentation) दुसऱ्या टप्प्यातील कामकाज, दावे-हरकती स्वीकारणे, सुनावणी प्रक्रिया आणि अंतिम निपटारा कसा करावा याविषयी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले. उपस्थित अधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले.
या प्रशिक्षणास जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार (AERO) आणि निवडणूक विभागाशी संबंधित सर्व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












