नांदेड १३ सप्टेंबर(प्रतिनिधी: माधव वाघमारे)
मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषणाची भूमिका घेतली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने कूच करण्यात येणार असून, नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांमधील गावोगावातून मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नांदेड येथील पत्रकार परिषदेत करण्यात आले.
पदयात्रेचे नियोजन अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे निघालेल्या पदयात्रेचा मुक्काम पाटोदा (जि. बीड), श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर), हडपसर (पुणे) आणि खोपोली (जि. रायगड) येथे राहणार आहे. त्यानंतर पाचव्या दिवशी सकाळी १० वाजता आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे.
नांदेड जिल्ह्यातून गावोगावातून सहभाग मुंबईतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावोगावात जनजागृती करून जास्तीत जास्त संख्येने मुंबईकडे रवाना व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हे आंदोलन केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लोकशाही व संविधानिक मार्गाने सुरू असलेला संघर्ष आहे.
शांतता, संयम आणि शिस्त हाच आंदोलनाचा मार्ग मुंबईतील आंदोलनाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागणार नाही, याची प्रत्येक आंदोलकाने काळजी घ्यावी. कायदा व सुव्यवस्था राखावी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये, कोणाशीही वाद घालू नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार शांततेत, संयमाने आणि संविधानिक मार्गानेच आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांतील मराठा समाजबांधव, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन मुंबईतील आंदोलनाला बळ द्यावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेस उपस्थित प्रमुख मान्यवर: सुमित्रा वडस्कर, अरुणा जाधव, राणी दळवी, कल्पना चव्हाण, सुनिता बोंगाणे, सुनिता शिंदे, सुचिता जोगदंड वडजे, अर्चना होगे, श्याम वडजे, भुजंगा पाटील, गिरीश जाधव, भगवान कदम, माधव घोगरे, ऋषी वानखेडे आणि विक्रम बामणीकर.
एकच आवाहन: १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटीकडे चला! मुंबईच्या आझाद मैदानाकडे चला! मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभूराजे!












