नांदेड १८ सप्टेंबर(प्रतिनिधी माधव वाघमारे)
जिह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक आणि ५ ब्रास रेती असा एकूण ४० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर २०२६ च्या रात्री नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान, मुदखेडकडून कांदा मार्केट, वाजेगाव बायपासकडे एका हायवा वाहनातून बेकायदेशीररीत्या रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांव,नी पंचांसमक्ष कांदा मार्केट रोड, वाजेगाव बायपास येथे सापळा रचला. संशयित हायवा ट्रक येताच cत्याला थांबवून पाहणी केली असता त्यात रेती भरलेली आढळली. चालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना किंवा रॉयल्टी पावती नसल्याचे स्पष्ट झाल्याने चालक आंबादास गणेश बैने (वय २३ वर्षे, रा. शक्तीनगर, इतवारा, ता. जि. नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले.
जप्त केलेला मुद्देमाल:
- हायवा ट्रक (क्र. MH 26 BE 1718): किंमत रु. ४०,००,०००/-
- ५ ब्रास रेती: किंमत रु. २५,०००/-
- एकूण मुद्देमाल: रु. ४०, २५,०००/-
या प्रकरणी आरोपीविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १२१३/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता सहकलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मा. सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वात पोउपनि. व्यंकट कुसमे व पोलीस अंमलदार भिसे, कल्याणकर, टिपरसे, तेलंग, गफार शेख यांच्या पथकाने केली आहे.












