नांदेड (प्रतिनिधी माधव वाघमारे) दिनांक ३१ ऑक्टोंबर
नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान, मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४० लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी प्रभारी अधिकारी मुदखेड यांना मौजे वासरी रोडवर वाहनामधून अवैधरीत्या रेतीची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन हायवा क्रमांक MH-26 CH-2418 अडवून पाहणी केली. तपासणी केली असता वाहनामध्ये अंदाजे ५ ब्रास रेती आढळली. चालकाकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी किंवा कागदपत्राबाबत चौकशी केली असता ही वाहतूक अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले.
४० लाखांचा हायवा व रेती जप्त
पोलिसांनी पंचांसमोर हायवा (किंमत अंदाजे ४० लाख रुपये) आणि त्यातील ५ ब्रास रेती (किंमत २५,००० रुपये) असा एकूण ४०,२५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दोन जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी खालील आरोपींविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २२९/२०२६, कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता, २०२३ सह कलम ४८(७)(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे: १. शिओम उर्फ शिवम नागराव वाघमारे (वय २१ वर्षे, रा. बळीरामपूर, ता. जि. नांदेड) २. संतोष सुदाम येवले (हायवा मालक, रा. जानापुरी, ता. लोहा)
पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक भोकर श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि/गणेश कराड, पोलीस उपनिरीक्षक/आकाश सरोदे, तसेच पोलीस अंमलदार राजेश नंद, सुरेश जाधव आणि रमेश पुणेబోईनवाड (सर्व नेमणूक मुदखेड) यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. नांदेड जिल्हा पोलिसांकडून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध ही कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेडच्या वतीने करण्यात आले आहे.












