नांदेड (प्रतिनिधी माधव वाघमारे) दिनांक ३१ ऑक्टोंबर
नांदेड पोलीस दलात प्रदीर्घ काळ निष्कलंक व प्रामाणिक सेवा बजावून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या ०१ पोलीस अधिकारी आणि ०४ पोलीस अंमलदारांचा सत्कार व निरोप समारंभ आज दिनांक ३१/१०/२०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील ‘मंथन हॉल’ येथे मोठ्या उत्साहात आणि भावूक वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
प्रदीर्घ सेवेचा गौरव व कृतज्ञता
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांनी, सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांच्या पोलीस दलातील प्रदीर्घ सेवेबद्दल गौरव करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी व सुखी जीवनाच्या शुभेच्छा दिल्यात. पोलीस दलात सेवा बजावताना अधिकारी व अंमलदारांनी कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडणे, गुन्हे प्रतिबंध व तपास, वाहतूक नियमन तसेच विविध पोलीस कर्तव्ये पार पाडण्यासाठी बहुमूल्य योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले. यांच्या प्रदीर्घ सेवामुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत मोलाची भर पडली असून, त्यांच्या सेवाभावी योगदानाबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
सेवानिवृत्त झालेल अधिकारी व अंमलदार यांची नावे:
१. श्री. अशोक भिमराव गुडपे – पोलीस उपनिरीक्षक (नेमणूक: पोलीस स्टेशन माळाकोळी). २. श्री. दिगंबर संभाजीराव जोंधळे – ग्रेड पोलीस उपनिरीक्षक (नेमणूक: पोलीस मुख्यालय). ३. श्री. भिमराव सुगराव नरवाडे – चालक सहायक पोलीस उपनिरीक्षक (नेमणूक: पोलीस स्टेशन हदगाव). ४. श्री. वामन किशन कांबळे – पोलीस हवालदार, बक्कल क्र. २८०१ (नेमणूक: पोलीस मुख्यालय, नांदेड). ५. श्री. श्याम अर्जुनराव काळे – पोलीस नाईक, बक्कल क्र. २३२९, (नेमणूक: पोलीस मुख्यालय, नांदेड).
मनोगत आणि सन्मान सोहळा
समारंभदरम्यान सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव व्यक्त केले. पोलीस दलातील सेवा ही केवळ नोकरी नसून समाजाच्या सुरक्षेसाठी जबाबदारीने पार पाडलेले कर्तव्य असल्याचे नमूद करत, सेवाकाळात मिळालेल्या सहकार्याबद्दल वरिष्ठ अधिकारी, सहकारी अधिकारी व अंमलदारांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व अधिकारी व अंमलदारांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. सदर कार्यक्रमास मा. सुनील माने, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन पोलीस निरीक्षक महादजी मांजरमकर (पोलिस कल्याण विभाग), मारोती कांबळे व महिला अंमलदार सविता भिमलवाड यांनी केले.
या निरोप समारंभप्रसंगी पोलीस अधीक्षक कार्यालयातील इतर अधिकारी, पोलीस अंमलदार आणि सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.












