प्रतिनिधी / माधव वाघमारे नांदेड, दि. ४ नोव्हेंबर
जागतिक पातळीवरील ‘अल-निनो’च्या प्रभावामुळे यंदा संपूर्ण महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे उपलब्ध जलसाठा अतिशय काटकसरीने वापरून पुढील ऑगस्ट २०२७ पर्यंत संपूर्ण नांदेड शहराला अखंडित पाणीपुरवठा करण्याचे प्रचंड मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. या गंभीर संकटाची दखल घेत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविता संतोष मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात आज एक तातडीची व अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
प्रशासकीय प्रमुख व लोकप्रतिनिधींची उपस्थिती
या बैठकीला मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपमहापौर दिपकसिंह रावत, महिला व बाल कल्याण सभापती सौ. सदिच्छा सोनी पाटील, उपसभापती सौ. निरंजना लांडगे, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, माजी महापौर तथा नगरसेवक सौ. जयश्री निलेश पावडे, माजी सभापती तथा नगरसेवक किशोर स्वामी, नगरसेवक संजय घोगरे पाटील, दिलीप कंदकुर्ते, अमित तेहरा, माजी नगरसेवक उमेश पवळे, शहर अभियंता सुमंत पाटील, उपअभियंता प्रकाश कांबळे, नरेंद्र सुजलेगांवकर, सतीश ढवळे यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे सर्व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
गेल्या महिनाभरात मनपाची कडक कारवाई
बैठकीच्या सुरुवातीला शहर अभियंत्यांनी पाणी पुरवठा विभागातर्फे गेल्या महिनाभरात करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर केला:
- १०९ अनधिकृत नळजोडण्या खंडित: शहरातील अवैध पाणी वापर रोखण्यासाठी १०९ बेकायदेशीर नळ जोडण्या तोडण्यात आल्या आहेत.
- २३१ ठिकाणी गळती दुरुस्ती: पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी शहरात २३१ ठिकाणची पाणी गळती तातडीने दुरुस्त करण्यात आली.
- ८० नवीन तोट्या व १२१ अस्वामित्व नळ खंडित: सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी ८० नवीन तोट्या बसवण्यात आल्या असून १२१ अस्वामित्व नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.
- सांडपाणी पुनर्वापर व ‘रिचार्ज पिट’: डंकीन येथील मलशुद्धीकरण केंद्रातून दररोज २ एमएलडी (MLD) सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. तसेच पावसाचे पाणी साठवण्यासाठी शहरात २१ ठिकाणी ‘रिचार्ज पिट’ तयार करण्यात येत आहेत.
महापौरांचे प्रशासनाला ८ प्रमुख व कडक निर्देश
आगामी उन्हाळा आणि पुढील मान्सून येईपर्यंत पाणी पुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश देताना महापौरांनी खालील प्रमुख निर्णय व आदेश दिले:
१) सोशल मीडियावरून जनजागृती: पाणी बचतीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम राबवणे. २) टोल-फ्री तक्रार निवारण केंद्र: नागरिकांच्या पाणीविषयक तक्रारींसाठी तात्काळ तक्रार निवारण कक्ष स्थापन करून टोल-फ्री क्रमांक जाहीर करणे. ३) सर्व्हेक्षण व नळ खंडण: शहरातील अनधिकृत नळ जोडण्यांचे तातडीने सर्व्हेक्षण करून त्या खंडित करणे. ४) झोननिहाय पथके: बेकायदेशीर पाणी उपसा आणि डायरेक्ट मोटार लावून पाणी खेचणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी झोननिहाय विशेष पथके तैनात करणे. ५) मनुष्यबळात वाढ: पाणी गळती शोधणे व तिच्या तातडीने दुरुस्तीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ पुरवणे. ६) उपहारगृहांची तपासणी: शहरातील मुख्य रस्त्यांवरील हॉटेल्स व उपहारगृहांच्या (हॉटेल्स/रेस्टॉरंट्स) नळ जोडण्यांची कसून तपासणी करणे. ७) उत्तर व दक्षिण नांदेडची जबाबदारी: पाणी पुरवठ्याच्या सुलभ नियोजनासाठी दोन्ही अतिरिक्त आयुक्तांकडे अनुक्रमे उत्तर व दक्षिण नांदेडची स्वतंत्र जबाबदारी सोपवणे. ८) रात्रीच्या पाणीपुरवठ्यावर बंदी: रात्री १०.०० वाजेनंतर व मध्यरात्रीच्या वेळी कोणत्याही भागात पाणी पुरवठा केला जाऊ नये.
याव्यतिरिक्त शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर बागकाम, बांधकाम व अ-घरगुती कामांसाठी करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. तसेच भविष्यात टंचाईग्रस्त भागांसाठी विंधन विहिरी व खाजगी विहिरींचे अधिग्रहण करणे आणि टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन आतापासूनच तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नांदेडकरांनो, पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा महापौर सौ. कविता मुळे
“अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा नांदेड शहरावर तीव्र जलसंकट ओढवले आहे. पुढील वर्षी ऑगस्ट २०२७ पर्यंत आपल्याला उपलब्ध पाणी पुरवून वापरावे लागणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सर्व नागरिकांनी पाण्याचा अपव्यय पूर्णपणे थांबवावा. पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने धुणे, अंगणात सडा मारणे किंवा इतर कामांसाठी करू नये. संकट नक्कीच मोठे आहे, परंतु सर्व नांदेडकरांच्या सकारात्मक सहकार्याने आपण या कठीण परिस्थितीवर निश्चितपणे मात करू!” — सौ. कविता संतोष मुळे, महापौर (नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका)












