नांदेड (प्रतिनिधी – माधव वाघमारे) दि ५ नोव्हेंबर
दुष्काळ आणि पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी प्रशासनाने केवळ कागदोपत्री नियोजनापुरते मर्यादित न राहता, जलसंधारणाची विविध कामे लोकसहभागातून हाती घेत प्रत्यक्ष श्रमदानाची व्यापक लोकचळवळ उभी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने अर्धापूर तालुक्यातील डौर येथील नंदीग्राम पर्यटन केंद्रात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.०’ कार्यशाळा आणि जिल्हास्तरीय दुष्काळ व पाणीटंचाई आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि एकजुटीने काम करण्याचे निर्देश दिले.
श्रमदानाला प्रोत्साहन देणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘व्ही.बी.-जी रामजी’च्या माध्यमातून माती नाला बांध, जलसंधारण आणि पाणलोट विकासाची कामे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने राबवावीत. गावांमध्ये लोकसहभाग वाढवून श्रमदानाला जास्तीत जास्त प्रोत्साहन दिले पाहिजे.
चांगले काम करणाऱ्या गावांना स्वतः जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी भेट देऊन श्रमदानात सहभागी होतील, तसेच आठवड्यातून किमान दोन ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हा केवळ एक शासकीय उपक्रम न राहता ती एक खरी लोकचळवळ बनली पाहिजे. गावविकास, जलसंधारण, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक परिवर्तनासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अभियानात नांदेड जिल्हा अव्वल राहावा – सीईओ महेश पाटील
मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी अभियानातील गुणांकन निकषांनुसार कामांचे नियोजन करण्याचे निर्देश दिले. ग्रामस्तरावरील प्रशासन अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी सर्व विभागांमध्ये उत्तम समन्वय असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यालयाकडून प्राप्त झालेल्या सूचना तातडीने ग्रामस्तरापर्यंत पोहोचवाव्यात आणि दर सोमवारी विभागनिहाय आढावा घेऊन प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढावेत. ग्रामसेवकांनी शासकीय अभिलेख चोख व अद्ययावत ठेवावेत. तसेच घरकुल, पाणीपुरवठा, स्थानिक निधी, जल व मृदसंधारणाची कामे अत्यंत प्रभावीपणे राबवावीत. यासोबतच बालविवाह प्रतिबंध आणि व्यसनमुक्तीसारख्या महत्त्वाच्या सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य द्यावे. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यास नांदेड जिल्हा या अभियानात राज्यात अव्वल ठरेल, असा दृढ विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यशाळेत विविध विषयांवर मार्गदर्शन
कार्यशाळेच्या सुरुवातीला प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहाय्यक गटविकास अधिकारी सुधीर पाटील यांनी मानले.
या कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी खालील विषयांवर मार्गदर्शन केले:
- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सादरीकरण: मधुकर मोरे
- पाणीटंचाई निवारण: उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड
- घनकचरा व्यवस्थापन: उपमुख्य कार्यकारी अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड
- चारा टंचाई नियोजन: डॉ. प्रवीणकुमार घुले
- ग्रामसेवक संघटनेच्या वतीने अमृत शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, डी.बी. गिरी, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












