नांदेड २५ एप्रिल प्रतिनिधी
नांदेड शहरात सार्वजनिक शांतता राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह’ अंतर्गत करण्यात आलेल्या ताज्या कारवाईत, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या १६ जणांसह एकूण १९ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या एका व्यक्तीचाही समावेश आहे.
पोलीस अधीक्षक अभिनश कुमार आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या सूचनेनुसार, पथक प्रमुख सपोनि भागवत नागरगोजे व चार्ली पोलीस अंमलदारांनी २३ आणि २४ एप्रिल रोजी ही धडक कारवाई केली.
विभागीय कारवाईचा तपशील:
- भाग्यनगर परिसर: जिरायत मैदान येथे मद्यपान करून शांतता भंग करणाऱ्या एका व्यक्तीवर कलम ११०/११७ म.पो. कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. यावेळी परिसरातील वाईन शॉप आणि हॉटेलचीही तपासणी करण्यात आली.
- विमानतळ पोलीस ठाणे हद्द: नाईक चौक आणि शिवमंदिर परिसरात ३ मद्यपींवर कारवाई झाली. तसेच, नमस्कार चौक येथे एका इसमाकडे लोखंडी खंजर मिळून आल्याने त्याच्यावर ‘भारतीय हत्यार कायद्या’नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. संशयास्पद रित्या वावरणाऱ्या इतर २ जणांवरही कारवाई करण्यात आली.
- शिवाजीनगर: ज्योती टॉकीज रोडवर मद्यपान करणाऱ्या २ जणांवर कारवाई करण्यात आली. शैक्षणिक संस्थांच्या परिसराचीही यावेळी विशेष पाहणी करण्यात आली.
- नांदेड ग्रामीण: एम.आय.डी.सी. भागात ४ व्यक्तींवर सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.
- दामिनी पथकाची कामगिरी: दामिनी पथकाने विसावा गार्डन परिसरात आरडाओरडा करून शांततेचा भंग करणाऱ्या ६ जणांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर कारवाई केली.
पोलीस अधीक्षकांचे आवाहन
नांदेड शहरात कोणीही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करू नये किंवा मद्यपींना जागा उपलब्ध करून देऊ नये. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारची धडक मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक अभिनश कुमार यांनी दिला आहे.
वृत्त संकलन
प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड












