| दिनांक: ०७ जुलै २०२६ प्रतिनिधी: माधव वाघमारे
नांदेड: शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलाने धडक मोहीम हाती घेतली आहे. अवैध अग्निशस्त्रांची खरेदी-विक्री आणि ते बाळगणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आज एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. निळा रोडवरील नरसिंग चौक परिसरातून पोलिसांनी दोन गावठी पिस्तूल जप्त करत एकूण तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नांदेड शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची तपासणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. श्री. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार कॉम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते. याच दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एका गोपनीय बातमीदाराकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली की, निळा रोडवरील नरसिंग चौक येथे दोन इसम पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने थांबलेले आहेत.
माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सापळा रचला व संशयास्पद रित्या फिरणाऱ्या दोन इसमांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे १) शिवराज रंजीत दळवे (वय ३१, व्यवसाय- शेती, रा. कृष्णानगर, डी मार्ट जवळ, नांदेड) आणि २) सरमुखसिंग जगतसिंग रामगडीया (वय ३९, व्यवसाय- नोकरी, रा. शिकारघाट, ता. मुदखेड) अशी सांगितली. पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कमरेला २ गावठी पिस्तूल मिळून आल्या. पोलिसांनी त्या तात्काळ जप्त केल्या.
शस्त्र पुरवठादार गजाआड; मध्य प्रदेश कनेक्शन उघड!
ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, त्यांनी सदरच्या पिस्तूल या बालाजी बबन सांगळे (वय १८, रा. गॅस गोडाऊनच्या मागे, वसरणी, नांदेड) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून संशयित आरोपी बालाजी सांगळे याचा शोध घेऊन त्यालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, हे शस्त्र त्याने मध्य प्रदेशातील रामण घाट येथील रहिवासी रतनसिंग भाटीया याच्याकडून आणल्याचे निष्पन्न झाले. सध्या मुख्य पुरवठादार रतनसिंग भाटीया फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
या धडक कारवाईत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आणि आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी विमानतळ पोलीस स्टेशन, नांदेड यांच्या ताब्यात देण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई:
सदरची धडाकेबाज कामगिरी मा. श्री. डॉ. नीलाभ रोहन (पोलीस अधीक्षक, नांदेड), मा. श्रीमती अर्चना पाटील (अपर पोलीस अधीक्षक, भोकर), मा. श्री. सुरज गुरव (अपर पोलीस अधीक्षक, नांदेड) आणि मा. श्री. अतुल भोसले (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. महेश कोरे, तसेच पथकातील पोहेकॉ सुनील गटलेवार, मिलिंद नरबाग, पोकॉ श्रीराम दासरे, मनोज राठोड, संघरत्न गायकवाड, महेश बडगु, चालक सुधाकर देवकत्ते व सायबर सेलचे पोहेकॉ राजू सिटीकर, दिपक ओढणे यांनी अत्यंत चोखपणे पार पाडली.
नांदेड पोलिसांचे नागरिकांना आवाहन:
कोणत्याही प्रकारची अवैध शस्त्रे बाळगणे अथवा सार्वजनिक ठिकाणी त्यांचा वापर करणे हा अतिशय गंभीर व दखलपात्र गुन्हा आहे. नागरिकांना अशा प्रकारच्या कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला अथवा पोलीस नियंत्रण कक्षास (Control Room) द्यावी. कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.












