नांदेड ७ जून (प्रतिनिधी माधव वाघमारे)
सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) धर्माबाद येथील एका अभियंत्याला फोन करून पाच हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणि पैसे न दिल्यास गोळ्या घालून जिव्याने मारण्याची धमकी देणाऱ्या तीन अट्टल आरोपींना गजाआड करण्यात नांदेड स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) अवघ्या २४ तासांत यश आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक ०६ जून २०२६ रोजी धर्माबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेले शाखा अभियंता श्री. हनुमंत रावसाहेब नरवाडे यांना एका अज्ञात इसमाने फोन केला. “मला पाच हजार रुपयांची खंडणी द्या, अन्यथा तुम्हाला गोळ्या घालून जिवानिशी ठार मारीन,” अशी धमकी या अज्ञात इसमाने दिली. या धक्कादायक प्रकारानंतर अभियंता नरवाडे यांनी तातडीने धर्माबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसात गु.र.नं. १४०/२०२६, कलम ३०८(५) बीएनएस (BNS) अन्वye गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षकांचे आदेश अन ‘एलसीबी’ ॲक्शन मोडमध्ये!
सरकारी अधिकाऱ्याला थेट जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नांदेडचे पोलीस अधीक्षक मा.श्री. अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक (भोकर) मा.श्रीमती अर्चना पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक (नांदेड) मा.श्री. सुरज गुरव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.
या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोसले व सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.
तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदाराच्या जाळ्यात आरोपी अडकले
गुन्ह्याचा तपास करत असताना, आज दिनांक ०७ जून २०२६ रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला तांत्रिक पुरावे आणि गोपनीय बातमीदाराकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सर्वप्रथम मुख्य आरोपी पांडुरंग तोलबा वन्ने (वय ६० वर्षे, मूळ रा. वाका ता. लोहा, ह.मु. सुनिल नगर, बळीरामपूर, नांदेड) याला ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आणि या गुन्ह्यात त्याला साथ देणाऱ्या इतर दोन साथीदारांची नावे उघड केली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ पावले उचलत इतर दोन आरोपींनाही अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१) पांडुरंग तोलबा वन्ने (वय ६०, रा. वाका ता. लोहा, ह.मु. सुनिल नगर, बळीरामपूर, नांदेड)
२) देविदास गणेश गायकवाड (रा. जवाहर नगर तुप्पा, ता. जि. नांदेड)
३) अशोक वाघमारे (रा. एकलारा ता. मुखेड, जि. नांदेड)
मुद्देमाल जप्त आणि पुढील कारवाई
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला ‘जिओ भारत’ कंपनीचा २०००/- रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी तिन्ही आरोपींना धर्माबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
कामगिरी करणारे पोलीस पथक:
ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सपोनि रवि वाहुळे यांच्यासह ग्रेड पोउपनि माधव केंद्रे, ग्रेड पोउपनि बळीराम दासरे, पोलीस अंमलदार देविदास चव्हाण, मोतीराम पवार, महेश बडगु, सिद्धार्थ सोनलसळे आणि सायबर सेलचे राजू सिटीकर व दिपक ओढणे यांच्या पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक मा.श्री. अबिनाश कुमार यांनी संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक केले आहे.












