नांदेड १८जुलै ( प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड जिल्ह्यातील अवैध व्यवसाय पूर्णत बंद करण्याच्या उद्देशाने नांदेड पोलीस प्रशासनाने एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. जिल्ह्यातील अवैध दारू, हातभट्टी दारू निर्मिती आणि अवैध जुगार खेळणाऱ्या इसमांविरोधात दिनांक १७ जुलै २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी मास रेड (मोठी छापेमारी) मोहीम राबवण्यात आली. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ८,७१,७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण ६७ आरोपींवर कायदेशीर कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम
नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. श्री डॉ. नीलाभ रोहन यांच्या थेट आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आखण्यात आलेल्या या ‘मास रेड’मध्ये पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कारवाईचे नियंत्रण केले.
या मोहिमेत अप्पर पोलीस अधीक्षक (भोकर) मा. श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) मा. श्री. सुरज गुरव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) नांदेड येथील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
५६ गुन्हे दाखल, ६७ जणांना बेड्या
या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध दारू विक्री, हातभट्टी दारू तयार करणारे कारखाने आणि जुगार अड्ड्यांवर अचानक छापे टाकण्यात आले. या कारवाईत:
- जिल्ह्यात एकूण ५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- या गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या एकूण ६७ आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
- छापेमारीदरम्यान पोलिसांनी एकूण ८,७१,७९०/- रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळांवरून जप्त केला आहे.
पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या धडक निर्णयामुळे जिल्ह्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे. जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात यापुढेही अशीच कठोर मोहीम सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.












