नांदेड ३० मार्च प्रतिनिधी
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. जिल्ह्याला दि. ३० मार्चपासून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, या काळात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार, ३० व ३१ मार्च तसेच १ आणि ३ एप्रिल २०२६ या चार दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. यासोबतच विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मध्यम पाऊस पडू शकतो. ही नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विजांपासून बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी करा:
- पावसाची पूर्वकल्पना असल्यास घराबाहेर जाणे टाळा.
- जर तुम्ही मोकळ्या जागेत असाल आणि सुरक्षित इमारत जवळ नसेल, तर सखल भागात जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
- वीज चमकत असताना घराची बाल्कनी, छत किंवा बाहेरील ओट्यावर थांबू नका.
- घरातील विद्युत उपकरणे (टीव्ही, फ्रिज इ.) त्वरित बंद करा.
- पाणी किंवा ओल्या जागेत उभे असाल तर तात्काळ बाहेर पडा.
काय करू नये? - वीज चमकत असताना लँडलाईन फोनचा वापर टाळा.
- शॉवरखाली अंघोळ करू नका किंवा घरातील पाण्याचे नळ, पाईपलाईन यांना स्पर्श करू नका.
- लोखंडी खांब, तारांचे कुंपण किंवा धातूच्या शेडखाली आसरा घेऊ नका.
- उंच झाडाखाली किंवा धातूच्या मनोऱ्याजवळ उभे राहणे धोक्याचे आहे.
- घराच्या उघड्या खिडकीतून किंवा दारातून वीज पडताना पाहू नका, हे बाहेर थांबण्याइतकेच घातक ठरू शकते.
अचानक उद्भवणाऱ्या या हवामान बदलामुळे शेतीकामात असलेल्या नागरिकांनी आणि पशुपालकांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
वृत्त संकलन:
प्रतिनिधी – माधव वाघमारे












