नांदेड ७ सप्टेंबर (प्रतिनिधी : माधव वाघमारे) देशाचे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज, दि. ०७ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी ११.०० वाजता आयोजित विशेष कार्यक्रमात महापौर सौ. कविता संतोष मुळे यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
राजे उमाजी नाईक हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील पहिले आद्यक्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यसमरापूर्वीच त्यांनी महाराष्ट्राच्या भूमीत ब्रिटिशांच्या जुलमी आणि अन्यायी राजवटीविरुद्ध जोरदार सशस्त्र बंड पुकारले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा महान आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी रामोशी समाज व स्थानिक जनतेला संघटित केले आणि सलग १४ वर्षे इंग्रज सत्तेला हादरे देत ‘सळो की पळो’ करून सोडले होते. त्यांच्या या अभूतपूर्व त्यागाचे आणि पराक्रमाचे स्मरण आज या प्रसंगी करण्यात आले.
या अभिवादन प्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त अभिजित वायकोस, उपायुक्त गंगाधर ईरलोड, उपायुक्त स. अजितपालसिंघ संधु, उपायुक्त नितीन गाढवे, मुख्य लेखा परीक्षक आनंद ऐनवाड, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, वरिष्ठ लिपीक शुभांगी चौधरी, लिपीक श्रध्दा बुरसे यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












