नांदेड १० एप्रिल प्रतिनिधी
शहरातील चोरीच्या घटना आणि शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नांदेड पोलीस दलाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत शहरात विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. गेल्या चार दिवसांच्या सततच्या कारवाईत ८८ पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असून, अनेक ‘ऑन रेकॉर्ड’ गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली आहे.
रात्रभर चालली शोधमोहीम
दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११:०० वाजेपासून ते १० एप्रिलच्या पहाटे ३:०० वाजेपर्यंत हे कोंबिंग ऑपरेशन अत्यंत गोपनीयरीत्या राबवण्यात आले. यामध्ये पोलीस अधीक्षकांसह अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि विविध पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अशा एकूण ३९ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांच्या मदतीला ११९ पोलीस अंमलदार तैनात होते.
कारवाईचा तपशील (४ दिवसांतील गोषवारा):
- तडीपार गुन्हेगार: कलम ५५, ५६, ५७ अन्वये एकूण ६७ तडीपार गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.
- MPDA गुन्हेगार: MPDA अंतर्गत सुटलेल्या २३ सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवण्यात आली.
- बॉण्ड भंग: जामिनावर सुटलेल्या १९ गुन्हेगारांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्याने त्यांच्यावर कारवाई झाली.
- शस्त्र बाळगणारे: अवैध शस्त्र बाळगणाऱ्या १५ जणांविरुद्ध ‘आर्म ॲक्ट’ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विविध पोलीस ठाण्यांतर्गत झालेली कारवाई:
या मोहिमेत शहरातील प्रमुख पोलीस ठाण्यांनी मोठी कामगिरी केली आहे:
- वजीराबाद पोलीस: सर्वाधिक ८ गुन्हे दाखल (कलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा).
- नांदेड ग्रामीण: २ गुन्हे दाखल.
- विमानतळ पोलीस: १ गुन्हा (२ आरोपी).
- भाग्यनगर पोलीस: २ गुन्हे दाखल.
- स्थानिक गुन्हे शाखा (LCB): ४ महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणले.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशन दरम्यान ७६ संशयितांची तपासणी करण्यात आली असून एकूण ६७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
“शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष आहे. ही मोहीम यापुढेही सुरूच राहील,” असे संकेत पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहे.












