नांदेड २४ एप्रिल प्रतिनिधी
शहरात वाढत्या चोऱ्या आणि शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अभिनश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ राबवण्यात येत आहे. आज, २४ एप्रिल रोजी पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेच्या दरम्यान शहरात राबवलेल्या विशेष कोंबिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या १२ दिवसांत तब्बल १३९ हून अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असून अनेकांची कसून तपासणी सुरू आहे.
पहाटेच्या सुमारास पोलिसांचा धाडसी छापा
पोलीस अधीक्षक अभिनश कुमार यांच्या संकल्पनेतून आज पहाटे शहराच्या विविध भागांत कोंबिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अंमलदार यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या मोहिमेत एकूण २८ अधिकारी आणि ९७ अंमलदारांच्या ताफ्याने सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.
कारवाईचा सविस्तर तपशील:
आजच्या मोहिमेत आणि मागील १२ दिवसांतील सातत्यपूर्ण कारवाईचा गोषवारा खालीलप्रमाणे आहे:
- हद्दपार आरोपींवर नजर: कलम ५५, ५६ नुसार हद्दपार केलेल्या ३५ आरोपींची तपासणी करण्यात आली.
- सराईत गुन्हेगार: शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या ५८ सराईत गुन्हेगारांना चेक करण्यात आले.
- MPDA मधील सुटलेले गुन्हेगार: यापूर्वी MPDA अंतर्गत कारवाई झालेले २७ गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर होते.
- शस्त्र बाळगणारे: अवैध शस्त्र बाळगणाऱ्या १ आरोपीवर आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- वॉरंट बजावणी: ५ जणांना अटक वॉरंट (BW) तर ५ जणांना समन्स बजावण्यात आले आहेत.
वजिराबाद आणि विमानतळ परिसरात गुन्हे दाखल
आजच्या मोहिमेदरम्यान वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ आरोपींविरुद्ध आर्म ॲक्ट आणि भा.दं.वि. कलमान्वये गुन्हा (गु.र.नं. १९९/२६) नोंदवण्यात आला. तसेच, विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्या ८ जणांना बेड्या
गेल्या काही दिवसांत (६ एप्रिल ते २४ एप्रिल) शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यामध्ये मपोका कलम ५५ आणि ५६ नुसार हद्दपार केलेले ८ इसम शहरात वावरताना मिळून आले. त्यांच्यावर कलम १४२ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संपूर्ण मोहिमेत आतापर्यंत एकूण ११० आरोपींविरुद्ध कारवाई करून ९४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नांदेड पोलीस दलाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली असून, शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
बातमी: प्रतिनिधी माधव वाघमारे, नांदेड












