नांदेड, दि. १६ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही १८ डिसेंबर हा दिवस ‘अल्पसंख्यांक हक्क दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. अल्पसंख्यांक समाजाला केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, सवलती व हक्कांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात हा दिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व विभागांना निर्देश देण्यात आले आहेत.
अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव व्हावी, तसेच समाजात जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी अशासकीय समाजसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट तसेच विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, व्याख्यानमाला, चर्चासत्रे व परिसंवादांचे आयोजन करण्यात येणार असून, स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच अल्पसंख्याक विकास विभागाने १० डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या परिपत्रकातील सूचनांनुसार सर्व कार्यक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कार्यक्रमांचे आयोजन करताना आदर्श आचारसंहितेचा कोणताही भंग होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांनी ‘अल्पसंख्यांक हक्क दिवस’ हा उपक्रम व्यापक व प्रभावी पद्धतीने राबवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.












