नांदेड २२ जानेवारी प्रतिनिधी (माधव वाघमारे)
नांदेड येथे होणाऱ्या श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक ‘हिंद की चादर’ कार्यक्रमाच्या सुरक्षेची जबाबदारी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथून याबाबतचे आदेश देण्यात आले असून डॉ. शर्मा हे २३ जानेवारी रोजी सकाळी नांदेड शहरात दाखल होणार आहेत.
भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) निवड झाल्यानंतर डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी आपल्या सेवाकालाची सुरुवात नांदेड परीक्षेत्रात उपविभागीय पोलीस अधिकारी (डी.वाय.एस.पी.) म्हणून केली होती. त्या काळात नांदेडमध्ये ‘गुरु ता गदी’ हा भव्य धार्मिक कार्यक्रम पार पडला होता. त्या वेळी तत्कालीन नांदेड पोलीस अधीक्षक रवींद्रकुमार सिंघल आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचा बंदोबस्त यशस्वीपणे सांभाळला होता.
धार्मिक, ऐतिहासिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचा बंदोबस्त हाताळण्याचा अनुभव लक्षात घेऊन सध्या पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर कार्यरत असलेले डॉ. मनोजकुमार शर्मा यांची नांदेडसाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. महासंचालक (प्रशासन) विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
त्या अनुषंगाने ‘हिंद की चादर’ कार्यक्रमासाठी २४ व २५ जानेवारी रोजी होणाऱ्या मुख्य समारंभांच्या काळात संपूर्ण बंदोबस्ताची जबाबदारी डॉ. मनोजकुमार शर्मा हे प्रमुख सुरक्षा अधिकारी म्हणून सांभाळणार आहेत. लाखो भाविक, देश-विदेशातील मान्यवर आणि विविध धार्मिक नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या समागमाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट, नियोजनबद्ध आणि बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे.
डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या अनुभवामुळे ‘हिंद की चादर’ हा ऐतिहासिक कार्यक्रम शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.












