कंधार नांदेड २७ (प्रतिनिधी माधव वाघमारे)
तालुक्यातील मौजे घोडज येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री विरुपक्ष ऋषी महाराज संस्थानच्या वतीने गेल्या २०५ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेली वार्षिक यात्रा आणि भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २९ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी ही यात्रा संपन्न होणार आहे.
विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
यात्रेनिमित्त रविवार, दि. २९ मार्च रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. शितलताई साबळे पाटील (अहिल्यानगर) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. सोमवार, दि. ३० मार्च रोजी सकाळी ११ वाजता श्री विरुपक्ष ऋषी महाराजांची महापूजा व अभिषेक संपन्न होईल. त्यानंतर सामुदायिक महाप्रसाद व आंबिल वाटप करण्यात येईल. सायंकाळी पालखी व कावड मिरवणुकीनंतर रात्री १२ वाजता संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
भव्य कुस्त्यांची दंगल आणि बक्षिसे
मंगळवार, दि. ३१ मार्च रोजी दुपारी १ वाजता महाप्रसाद व भोजन होईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता यात्रेचे मुख्य आकर्षण असलेली ‘भव्य कुस्त्यांची दंगल’ रंगणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी खालीलप्रमाणे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत:
- प्रथम बक्षीस: ७००१ रुपये
- द्वितीय बक्षीस: ५००१ रुपये
- तृतीय बक्षीस: ३१५१ रुपये
विशेष म्हणजे, कुस्तीत पराभूत होणाऱ्या पैलवानासही श्री नारायण रामचंद्र लाडेकर यांच्या वतीने प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे.
भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
या यात्रेसाठी आनंदवाडी, जांभुळवाडी, संगमवाडी, पाताळगंगा यांसह परिसरातील अनेक गावांतील भजनी मंडळे उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी रात्री ७ वाजता भव्य पालखी मिरवणूक सोहळ्याने यात्रेची सांगता होईल.
या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त गावकडी मंडळी घोडज, जांभुळवाडी, आनंदवाडी, संगमवाडी आणि विरुपक्ष महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.












