नांदेड: ३० मार्च प्रतिनिधी
शहरात तलवारी आणि खंजर बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना विमानतळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी ५२,५०० रुपये किमतीच्या दोन तलवारी, एक खंजर आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे.
गुप्त माहितीवरून लावला सापळा
नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार यांनी गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी रात्रगस्त आणि सतर्कतेचे आदेश दिले आहेत. याच आदेशाचे पालन करत असताना २९ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास विमानतळ पोलीस ठाण्यातील डी.बी. पथकाला गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. नाथनगर परिसरातील रोडवर तीन तरुण मोटारसायकलवर बसून शस्त्रांसह फिरत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांची धाडसी कारवाई
मिळालेल्या माहितीची खातरजमा करून डी.बी. पथकाने दोन पंचासह नाथनगर परिसरात सापळा रचला. संशयास्पद रित्या आढळलेल्या तिन्ही तरुणांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे दोन तलवारी आणि एक धारदार खंजर मिळून आला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची ‘स्प्लेंडर’ मोटारसायकल (क्र. MH 26-CR-0803) आणि शस्त्रे असा एकूण ५२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१) चंदासिंग विठ्ठलसिंग चव्हाण (वय ३७ वर्षे, रा. कलंबर, ता. लोहा)
२) बालाजी उदयसिंग ठाकुर (वय २० वर्षे, रा. सांगवी-ब, नांदेड)
३) यश कल्याणसिंग ठाकुर (वय १९ वर्षे, रा. सांगवी-बु, नांदेड)
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अभिनाष कुमार पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील (भोकर), अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेंडगे, सपोनि संतोष जोंधळे, पोउपनि देशपांडे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सहभागी पोलीस अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक राणे करत आहेत.
वृत्त संकलन:
प्रतिनिधी: माधव वाघमारे












