नांदेड १७ मे प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि सुगंधित पानमसाल्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या आंतरराज्यीय तस्करांच्या मुसक्या आवळण्यात नांदेड ग्रामीण पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली चालविलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत पोलिसांनी तब्बल ३०,६३,६५० रुपयांच्या मुद्देमालासह एका आरोपीला अटक केली आहे.
कांदा मार्केट चौक परिसरात रचला सापळा
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे टापरे चौक, नांदेड परिसरात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, गाडेगाव रोडने बोंढार बायपास हायवेवरून एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी (क्र. MH-37-T-3601) प्रतिबंधित गुटखा घेऊन नांदेड शहरात येत आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कांदा मार्केट चौक परिसरात सापळा रचला. संशयास्पद बोलेरो पिकअप येताना दिसताच पोलिसांनी ती थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने पोलिसांना कट मारून, हयगय व निष्काळजीपणाने भरधाव वेगात वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करून सदर वाहन आडवले आणि चालकाला ताब्यात घेतले.
१८ प्रकारचा मुद्देमाल आणि वाहनाचा समावेश
ताब्यात घेतलेल्या वाहनाची झडती घेतली असता, त्यात महाराष्ट्र शासनाने मानवी शरीरास अपायकारक म्हणून बंदी घातलेला विविध कंपन्यांचा सुगंधित पानमसाला आणि गुटखा आढळून आला. यामध्ये:
- R.K. Classic PAN MASALA, ALIBABA Premium, SR-1 Scented Tobacco, AB Chewing Tobacco.
- विमल पान मसाला, राज निवास, विमल (मोठा), व्ही-१ टोबॅको, शेनशाह, राजबाबू पान मसाला.
- झेड एल-०१, एस पी पान मसाला, पी पी पान झर्दा, सागर पान मसाला इत्यादी १८ प्रकारचा मुद्देमाल व गुटख्यासह पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी, असा एकूण ३०,६३,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तेलंगणाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात; २ दिवसांची पी.सी.आर.
या कारवाईत पोलिसांनी रईस मोहम्मद अमेर मोहम्मद (वय ३१ वर्ष, व्यवसाय: चालक, रा. शांतीनगर, जिल्हा आदिलाबाद, राज्य तेलंगणा) या आरोपीला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५७४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५, २८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी (P.C.R.) सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे करत आहेत.
वरिष्ठांचे मार्गदर्शन व कौतुक
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) मा. श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) मा. श्री. सुरज गुरव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) मा. श्री. प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हा उघडकीस आणण्यात नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री. ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, पोलीस अंमलदार मारोती पर्चेलिंग, शंकर माळगे आणि धम्मपाल कांबळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे.
विशेष रिपोर्ट: प्रतिनिधी माधव वाघमारे, नांदेड.












