नांदेड ३१ मे प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील अवैध व्यवसाय पूर्णतः बंद करण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत एकाच वेळी ‘मास रेड’ (मोठी मोहीम) राबवण्यात आली. या धडक कारवाईत अवैध दारू, हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणारे, जुगार खेळणारे आणि गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर छापे टाकून एकूण १,२९,९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पाऊल
जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी शनिवार, दिनांक ३०/०५/२०२६ रोजी या विशेष मास रेडचे आयोजन केले होते. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात धडक मोहीम
सदर मास रेडची कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गोपनीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. या मोहिमेत:
- मा. श्रीमती अर्चना पाटील (अप्पर पोलीस अधीक्षक, भोकर)
- मा. श्री. सुरज गुरव (अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड)
यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) नांदेड येथील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
५० आरोपी गजाआड; ४६ गुन्हे दाखल
या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या अवैध दारू विक्री, हातभट्टी निर्मिती केंद्र, जुगार अड्डे आणि गोवंश वाहतूक करणाऱ्या ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण ४६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ५० आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण १,२९,९९०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध नांदेड पोलिसांची ही मोहीम यापुढेही अशीच तीव्रतेने सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
वृत्त संकलन व संपादन
प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड.












