नांदेड १ जुलै ( प्रतिनिधी, माधव वाघमारे) रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून समाजाच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १ जुलै रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मुख्य सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मनपातील डॉक्टरांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याला पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपमहापौर दीपकसिंह रावत आणि स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंग गाडीवाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बिधानचंद्र रॉय यांना अभिवादन अन् डॉक्टरांचा गौरव
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे महान वैद्यकीय तज्ज्ञ आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री भारतरत्न डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
कोरोना संकटकाळ असो वा दैनंदिन आरोग्य व्यवस्था, नागरिकांना तत्पर आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवल्याबद्दल महापालिकेच्या वतीने सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार मानण्यात आले. तसेच उल्लेखनीय रुग्णसेवेबद्दल महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. महापालिकेत प्रथमच आरोग्य विभागाचे उपायुक्त स. अजितपालसिंग संधु यांच्या पुढाकाराने या राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार : मनपा आयुक्त
याप्रसंगी मार्गदर्शन करताना महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे म्हणाले की,
“डॉक्टर हे समाजाचे खऱ्या अर्थाने रक्षक आहेत. आजच्या आधुनिक युगात नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा अधिक सुलभ आणि गतिमान करण्यासाठी मनपाच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणि अद्ययावत वैद्यकीय उपकरणांचा वापर वाढवला जात आहे.”
नांदेड शहराला रोगमुक्त आणि आरोग्यसंपन्न बनवण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खाजगी आणि शासकीय डॉक्टरांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
लोकप्रतिनिधींची डॉक्टरांच्या प्रश्नांवर सकारात्मकता
- विशेष स्थायी समिती सभेचे आयोजन : स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंग गाडीवाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टरांच्या कार्याचा गौरव केला. तसेच डॉक्टर्स डे चे औचित्य साधून आरोग्य विभागाचे विविध प्रश्न आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी लवकरच एका ‘विशेष स्थायी समिती सभेचे’ आयोजन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
- प्रश्नांची सोडवणूक करणार : उपमहापौर दीपकसिंह रावत यांनी यावेळी डॉक्टरांची “मन की बात” ओळखून, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे नमूद केले.
मान्यवरांची मोठी उपस्थिती
या गौरव सोहळ्यास महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त स. अजितपालसिंग संधु, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत रिठ्ठे, उपवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बालाप्रसाद कुंटूरकर, डॉ. बदीयोद्दीन, डॉ. कल्याणकर यांच्यासह सर्व नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी आणि मनपा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या यशस्वी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे यांनी केले, तर उपस्थितांचे स्वागत, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. बळीराम भुरके यांनी केले.












