नांदेड १९ जुलै रविवार २०२६
शहरातील गर्दीच्या आणि मुख्य व्यापारी केंद्र असलेल्या जुना मोंढा ऑटोस्टॉप परिसरातून एका नागरिकाला गाठून भरदिवसा १,७०० रुपयांची रोकड लुटून पसार झालेल्या दोन अट्टल चोरट्यांना वजिराबाद गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासांत अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली चोरीची मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली आहे.
भरदुपारी घडली घटना
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दिनांक १८ जुलै २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास फिर्यादी वाजीद अली अहमद अली (वय ३० वर्षे, रा. कांदा मार्केट, गाडेगाव, नांदेड) हे जुना मोंढा ऑटोस्टॉप परिसरात सामान खरेदी करण्यासाठी पायी जात होते. याच दरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना गाठले व त्यांच्याशी झटापट सुरू केली. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या शर्टच्या वरच्या खिशातील १,७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि घटनास्थळावरून धूम ठोकली.
पोलीस अधीक्षकांचे तात्काळ आदेश अन् तपास चक्र गतिमान
दिवसाढवळ्या घडलेल्या या जबरी चोरीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांनी वजिराबादचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांना तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार, वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील बुलंगे व त्यांच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाने आवळल्या आवळल्या बेड्या
गुन्हे शोध पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या (खबरी) आधारे तपास करत संशयित आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी अत्यंत शिताफीने पुढील दोन आरोपींना ताब्यात घेतले:
१) रणजोतसिंग उर्फ बच्चूसिंग सतनामसिंग बावरी (वय २३ वर्षे, रा. ND-41K-2J, भवानीनगर, सिडको, नांदेड)
२) सैय्यद सलमान सैय्यद बाबुमियाँ (वय २४ वर्षे, रा. ND-41, सिडको, नांदेड)
पोलीस कोठडीत घेऊन सखोल चौकशी केली असता, दोन्ही आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेली रक्कम हस्तगत करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, गुन्ह्यासाठी त्यांनी वापरलेली मोटारसायकल ही देखील चोरीचीच होती, ती पोलिसांनी पुराव्याकामी जप्त केली आहे.
गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू
या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३७१/२०२६ कलम ३०९(४), ३(५) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील बुलंगे व त्यांचे पथक करत आहेत.
या पथकाने केली कामगिरी
सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक मा. श्री. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील बुलंगे, तसेच पोलीस अंमलदार सर्वश्री मठपती (HC/1218), चाऊस (HC/2345), सातपुते (HC/900), सुरनर (HC/1995), आरदवाड (HC/1280), शेळके (HC/2042), कदम (PC/3080), धुमाळ (PC/3184), राठोड (PC/14), पावडे (PC/1934), बावरी (PC/232), पोकळे (PC/154), पठाण (PC/3117), गच्चे (PC/754), क्षीरसागर (PC/3146) आणि चाटे (PC/248) (सर्व नेमणूक पोलीस स्टेशन वजिराबाद) यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
नांदेड पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन:
“बाजारपेठ, बसस्थानक व गर्दीच्या ठिकाणी खिसेकापूंपासून सावध राहावे. मौल्यवान वस्तू व रोख रक्कम सुरक्षित ठेवावी. कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा घटना निदर्शनास आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावाविशेष बातमी प्रतिनिधी: माधव वाघमारे












