नांदेड ३० जुलै (विशेष प्रतिनिधी)
शहर आणि परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असतानाच नांदेडच्या इतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मदिना नगर (देगलूर नाका) येथून भाड्याच्या घरातून सामान हलवताना झालेल्या तब्बल ८ लाख १२ हजार रुपयांच्या चोरीचा छडा अवघ्या काही दिवसांत लावत पोलिसांनी ५ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, चोरीस गेलेला संपूर्ण १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नेमकी घटना काय?
नौमानिया कॉलनी, नांदेड येथील रहिवासी शेख शहबाज शेख जाफर (वय ४० वर्ष) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजताच्या सुमारास मदिना नगर, देगलूर नाका येथील आपल्या भाड्याच्या घरातील सामान नौमानिया कॉलनी येथे हलवत असताना ही चोरी झाली होती. चोरट्यांनी संगनमत करून वैद्यकीय व्यवसाय आणि अपघात विम्यापोटी मिळालेली अंदाजे ₹८,१२,०००/- (आठ लाख बारा हजार रुपये) किमतीची ऐवज/रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २६१/२०२६ कलम ३०६, ३(५) बी.एन.एस. (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक माहिती आणि सिसीटीव्हीच्या आधारे आरोपी निष्पन्न
गुन्हा दाखल होताच इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तात्काळ हालचाली करत घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तपासाच्या इतर सूत्रांच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी खालील ५ संशयितांना ताब्यात घेतले:
१) पिराजी बाळू वाघमारे (वय ५१ वर्ष)
२) सुनिल बाबुराव रॅपनवाड (वय २६ वर्ष)
३) सुनिल चिमनाजी वाघमारे (वय २४ वर्ष)
४) साहेबरावा पिराजी वाघमारे (वय २८ वर्ष)
५) तनुष्क गणपत मेटकर (वय १९ वर्ष)
१००% मुद्देमाल जप्त; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
ताब्यातील आरोपींकडे सखोल आणि कडक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून चोरीस गेलेली संपूर्ण रोख रक्कम ₹८,१२,०००/- हस्तगत करण्यात आली आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलीस पथकाचे अभिनंदन
सदर उल्लेखनीय आणि यशस्वी कारवाई मा. डॉ. निलाभ रोहन (पोलीस अधीक्षक, नांदेड) आणि श्री. प्रशांत शिंदे (उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत इतवारा पोलीस ठाण्याचे पोनि/ रामेश्वर खनाळ, पोनि/ संजय शिंदे, पोउपनि/ आगलावे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार हरप्रितसिंग सुखई, शेख इजराइल, रेवणनाथ कोरनुळे, साहेबराऊ जगताप, बंडू कलंदर, मारोती गिते, बशीर चौधरी या सर्व कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
प्रतिनिधी, माधव वाघमारे












