नांदेड ४ ऑगस्ट ( प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड येथील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाने एका विधि संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तब्बल १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या ५ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, या कारवाईमुळे ३ दाखल गुन्ह्यांची उकल झाली आहे.
पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार वजिराबाद पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. ३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी नांदेड कोर्टाच्या पाठीमागील परिसरात गस्ती दरम्यान पोलीस उपनिरीक्षक सुनील बुलगे व कर्मचाऱ्यांना एका संशयित बालकाकडे हिरो कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल आढळली. वाहनाची नंबर प्लेट तुटलेली असल्याने संशय आल्याने त्यास थांबवून चौकशी केली असता, सदर वाहन (MH-26-AB-8751) वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. ३८९/२०२६ (कलम ३०३(२) BNS) मधील चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले.
नातेवाईकांच्या उपस्थितीत घेतलेल्या सखोल चौकशीत, या बालकाने त्याच्या घराजवळ आणखी चोरीच्या गाड्या लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर पंचांच्या समक्ष कारवाई करत एकूण ५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत ₹१,८५,०००/-):
- हिरो स्प्लेंडर प्लस: ₹२५,०००/- (गुन्हा क्र. ३८९/२०२६)
- हिरो होंडा स्प्लेंडर प्लस: ₹२५,०००/- (गुन्हा क्र. ३९०/२०२६)
- होंडा SP-125: ₹८०,०००/- (गुन्हा क्र. २९६/२०२६)
- होंडा शाईन: ₹३०,०००/- (पडताळणी सुरू)
- हिरो स्प्लेंडर प्लस: ₹२५,०००/- (पडताळणी सुरू)
सदर प्रकरणी बालकास ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून उर्वरित दोन वाहनांच्या गुन्ह्यांची पडताळणी केली जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन आणि पोलीस उपअधिक्षक रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोनि/लोढे, पोउपनि/सुनील बुलगे तसेच पोलीस अंमलदार शिवसांब मठपती, हबीब चाऊस, सरदार गुरुदिपसिंग, गणेश धुमाळ, विलास कदम, ज्वालासिंग बावरी, इम्रान पठाण, संतोष पोकळे, भाऊसाहेब राठोड व संतोष पावडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.












