प्रतिनिधी (माधव वाघमारे) १२ ऑगस्ट नांदेड: भारतीय स्वातंत्र्यानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत शहरात शालेय विद्यार्थ्यांची एक अभूतपूर्व आणि भव्य तिरंगा रॅली अत्यंत उत्साहात संपन्न झाली. या रॅलीमुळे संपूर्ण नांदेड शहरात देशभक्तीची एक नवी लाट उसळली असून नागरिकांकडून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आज सकाळी ठीक ८:०० वाजता शासकीय तंत्रनिकेतन चौकातील तिरंगा ध्वज परिसरातून महापौर सौ. कविता संतोष मुळे आणि मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. याप्रसंगी स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, शिक्षण, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, उपसभापती निरंजना लांडगे, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे, माजी सभापती किशोर स्वामी, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार व गिरीश कदम, उपायुक्त स. अजितपालसिंघ संधु व गंगाधर ईरलोड, शिक्षणाधिकारी प्रविणा मांदळे, मुख्य उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा बेग आणि क्रीडा अधिकारी रमेश चवरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व मनपा अधिकारी उपस्थित होते.
नांदेडचे रस्ते राष्ट्रभक्तीच्या रंगात न्हाले रॅलीच्या अग्रभागी सर्व लोकप्रतिनिधी, मनपा अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक तसेच एनसीसी आणि स्काऊट-गाईडचे पथक शिस्तबद्ध पद्धतीने चालत होते. मनपाच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांसह शहरातील नामांकित खाजगी शाळा आणि महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थी गणवेशात हातात तिरंगा घेऊन रॅलीत सहभागी झाले. “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम”च्या गगनभेदी घोषणांनी शहर दुमदुमून गेले. रॅलीच्या संपूर्ण मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी विद्यार्थ्यांचे जलोषात स्वागत केले.
घरोघरी तिरंगा फडकवण्याचे महापौरांचे आवाहन यावेळी बोलताना महापौर सौ. कविता मुळे म्हणाल्या, “‘हर घर तिरंगा’ अभियान हा आपल्या देशाप्रती आणि स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीवीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र उत्सव आहे. आज शालेय विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह कौतुकास्पद असून, नांदेडमधील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर आणि व्यापारी प्रतिष्ठानांवर सन्मानाने तिरंगा फडकवून या उत्सवात सहभागी व्हावे.”
या भव्य रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी मनपाच्या शिक्षण विभागाने विशेष परिश्रम घेतले. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वाहतूक पोलीस आणि स्वच्छता दूतांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मनपा प्रशासनाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.












