नांदेड ४ सप्टेंबर ( प्रतिनिधी : माधव वाघमारे)
ऊस पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर गंभीर परिणाम करणाऱ्या ‘पायरीला’ (पानावरील तुडतुडा) या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेळीच सतर्क राहून पिकाची नियमित पाहणी करावी आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
पायरीला किडीची लक्षणे व होणारे नुकसान पायरीला किडीची पिल्ले आणि प्रौढ कीटक उसाच्या पानांतील रस शोषून घेतात, ज्यामुळे पाने पिवळी पडतात. या किडीद्वारे पानांवर सोडल्या जाणाऱ्या चिकट मधासारख्या पदार्थावर काळी बुरशी वाढते. यामुळे उसाची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया बाधित होऊन वाढ खुंटते आणि उत्पादनात मोठी घट होते.
नियमित पाहणी व आर्थिक नुकसान पातळी शेतकऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा शेताच्या बांधावरील व दाट वाढलेल्या उसाची तपासणी करावी. पिकाच्या शेंड्यापासून १५ सें.मी. उंचीवर प्रति ५ एकरी १ प्रकाश सापळा (सायंकाळी ६ ते १०) लावावा.
- आर्थिक नुकसान पातळी: प्रति पान ३ ते ५ पिल्ले/प्रौढ किंवा १ अंडीपुंज आढळल्यास तात्काळ नियंत्रणाचे उपाय योजावेत.
एकात्मिक व जैविक कीड व्यवस्थापन प्रादुर्भावाच्या सुरुवातीला रासायनिक फवारणीची घाई न करता खालील उपायांवर भर द्यावा:
- शेताची स्वच्छता: एकदल तण नष्ट करावे आणि वाळलेले पाचट काढून टाकावे. नत्राचा अतिरेकी वापर टाळून योग्य प्रमाणात स्फुरद व पालाश द्यावे.
- भौतिक उपाय: पानांवरील पांढरे अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत. सकाळी पाने हलवून किडे खाली पाडून नष्ट करावेत.
- परोपजीवी मित्रकीटक (इपिरिकॅनिया): इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका या नैसर्गिक शत्रूचे ४ ते ५ हजार कोश किंवा ४ ते ५ लाख अंडी प्रति एकरी सोडावीत. शेतात मित्रकीटक आढळल्यास रासायनिक फवारणी पूर्णपणे टाळावी.
- बुरशीजन्य नियंत्रण: मेटारायझियम अॅनिसोपली बुरशीने बाधित पायरीला गोळा करून इतर प्रादुर्भावग्रस्त शेतात वापरावेत. मित्रकीटकांचे कोश असलेले पाचट जाळू नये.
रासायनिक नियंत्रण (आवश्यकता भासल्यास) जैविक घटक उपलब्ध नसतील आणि प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे गेला असेल तरच खालीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी:
- क्लोरपायरीफॉस २०% ईसी: १५०० मिली प्रति हेक्टर (५०० ते १००० लिटर पाण्यात).
- असिफेट ५०% + इमिडाक्लोप्रिड १.८०% एसपी: २५०० ग्रॅम प्रति हेक्टर (५०० लिटर पाण्यात).
अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.












