नांदेड ९ मे प्रतिनिधी
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या ताज्या अंदाजानुसार, नांदेड जिल्ह्यासाठी ९ आणि १० मे २०२६ असे दोन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
विजांच्या कडकडाटावेळी ‘या’ गोष्टी आवर्जून करा:
नैसर्गिक आपत्तीचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी खालील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे:
- सुरक्षित आश्रय घ्या: विजा चमकत असताना त्वरित घरात किंवा मजबूत इमारतीचा आधार घ्या. घराची बाल्कनी, छत किंवा बाहेरच्या ओट्यावर उभे राहणे टाळा.
- बाहेर असाल तर: जर तुम्ही मोकळ्या जागेत असाल आणि सुरक्षित इमारत जवळ नसेल, तर सखल भागात जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
- विद्युत उपकरणे: पावसाला सुरुवात होताच घरातील सर्व विद्युत उपकरणे बंद करा.
- पाण्यापासून दूर राहा: जर तुम्ही पाण्यात असाल, तर तात्काळ बाहेर पडा.
काय टाळावे (सावधानता):
- धातूच्या वस्तू: तारांचे कुंपण, विजेचे खांब, लोखंडी टॉवर आणि लोखंडी पत्र्याच्या शेडपासून दूर राहा.
- झाडांचा आधार नको: वादळी वाऱ्यात झाड पडण्याची किंवा वीज कोसळण्याची भीती असल्याने उंच झाडाखाली आश्रय घेऊ नका.
- घरातील काळजी: विजा चमकत असताना लँडलाईन फोन वापरू नका, शॉवरखाली अंघोळ करू नका आणि घरातील पाण्याचे नळ किंवा पाईपलाईनला स्पर्श करू नका.
- खिडक्यांपासून दूर राहा: घरात असताना उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहण्याचा प्रयत्न करू नका, हे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
अचानक उद्भवणाऱ्या या हवामान बदलामुळे शेती कामांचे नियोजन आणि प्रवासाचे वेळापत्रक जपून आखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
वृत्त संकलन:
प्रतिनिधी: माधव वाघमारे












