प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड दिनांक: ०७ जुलै नांदेड
देगलूर शेजारील तेलंगणा राज्यातून अपहरण झालेल्या एका अवघ्या ६ वर्षीय चिमुरडीची देगलूर पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत अवघ्या ४ तासांत सुखरूप सुटका केली आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे देगलूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आणि पीडित बालिकेला ताब्यात घेऊन तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक ०६ जुलै २०२६ रोजी तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यातील मदनुर मंडल अंतर्गत मदनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका ६ वर्षीय चिमुरडीचे अपहरण झाले होते. राजेंद्र गोविंद हरणे (वय ४३ वर्ष, व्यवसाय- मजुरी, रा. हिप्परगा थडी, मडंळ मदनुर, जि. कामारेड्डी, तेलंगणा) असे अपहरण करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मदनुर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १४३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७ (२) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेजारील राज्यात घडलेल्या या गंभीर गुन्ह्यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती.
गुन्ह्यातील आरोपी व पीडित चिमुरडीच्या वर्णनाबाबत सोशल मीडियावर काही माहिती फिरत होती. ही माहिती नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्या निदर्शनास आली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ आपल्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांना सतर्क केले आणि तात्काळ शोध घेण्याचे आदेश देऊन रवाना केले.
पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूरच्या गुन्हे शोध पथकाने आज दिनांक ०७ जुलै २०२६ रोजी देगलूर शहरात व परिसरात गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे शोध मोहीम राबवली. अत्यंत शिताफीने तपास करत पथकाने अवघ्या ४ तासांत ६ वर्षीय पीडित मुलगी आणि आरोपी राजेंद्र गोविंद हरणे या दोघांना देगलूर शहराच्या हद्दीतून ताब्यात घेतले. देगलूर पोलिसांनी तात्काळ मदनुर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांशी संपर्क साधून या दोघांनाही त्यांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे एका निष्पाप बालिकेची सुखरूप सुटका झाली आहे.
ही अत्यंत यशस्वी कामगिरी नांदेडचे माननीय पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, उप विभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत देगलूरचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड, पोलीस अंमलदार किरणकुमार वाघमारे, मोहम्मद इम्रान आणि शिवाजी आडसबे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. देगलूर पोलिसांच्या या वेगवान आणि कौतुकास्पद कामगिरीचे सर्व स्तरांतून प्रचंड कौतुक होत आहे.












