नांदेड ८ प्रतिनिधी
शहरातील चोरीच्या घटना आणि शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी नांदेड पोलीस दलाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या कारवाईत अवैध शस्त्रे बाळगणारे आणि सराईत गुन्हेगार अशा एकूण २८ आरोपींना अटक करण्यात आली असून २६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मध्यरात्री पोलीस रस्त्यावर; गुन्हेगारांचे धाबे दणाणले
दिनांक ७ एप्रिल रोजी रात्री ११:०० वाजल्यापासून ते ८ एप्रिल २०२६ च्या पहाटे ३:०० वाजेपर्यंत हे विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्यासह २९ अधिकारी आणि ११९ अंमलदारांनी सहभाग घेतला होता. शहरातील वजीराबाद, इतवारा, भाग्यनगर, शिवाजीनगर, विमानतळ आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी ही तपासणी मोहीम राबवण्यात आली.
कारवाईचा तपशील:
या ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी शहरातील ७५ तडीपार गुन्हेगार, ३४ सराईत गुन्हेगार (MPDA अंतर्गत) आणि २७ ‘बॉण्ड’ मधील गुन्हेगारांची कसून तपासणी केली. यादरम्यान अवैध शस्त्रे (आर्म्स अॅक्ट) बाळगल्याप्रकरणी खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली:
- नांदेड ग्रामीण: ६ गुन्हे, ६ आरोपी
- विमानतळ: ४ गुन्हे, ६ आरोपी
- भाग्यनगर: २ गुन्हे, २ आरोपी
- वजीराबाद: २ गुन्हे, २ आरोपी
- इतवारा: ७ गुन्हे, ७ आरोपी
- शिवाजीनगर: ५ गुन्हे, ५ आरोपी
या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण २६ गुन्हे दाखल करून २८ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
गुन्हेगारांना इशारा
शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे, अवैध शस्त्र बाळगणारे आणि हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांवर यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संकेत पोलीस प्रशासनाने दिला आहे. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
वृत्त संकलन
प्रतिनिधी माधव वाघमारे












