नांदेड ८ प्रतिनिधी (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध नांदेड पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह’ अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ३१ तळीरामांवर कायदेशीर बडगा उगारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेदरम्यान विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या दोन इसमांनाही अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांचा कडक पवित्रा
शहरातील सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी विशेष पथकांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ५, ६ आणि ७ एप्रिल २०२६ रोजी शहरभरात विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सपोनि श्री. भागवत नागरगोजे व चार्ली पोलीस अंमलदारांनी विविध भागांत पेट्रोलिंग करून ही धडक कारवाई केली.
कुठे आणि कशी झाली कारवाई?
शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
- भाग्यनगर: जिरायत मैदान आणि छत्रपती चौक परिसरात मद्यपान करून गोंधळ घालणारे ०५ इसम ताब्यात. या भागातील वाईन शॉप आणि हॉटेल्सचीही तपासणी करण्यात आली.
- नांदेड ग्रामीण: एमआयडीसी परिसरात सार्वजनिक शांतता भंग करणारे ०६ इसम पकडण्यात आले.
- वजीराबाद: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर आणि रेल्वे स्थानक परिसरातून ०२ जणांवर कारवाई.
- विमानतळ परिसर: मालटेकी रोड परिसरात ०२ तळीरामांना पकडले. येथे एका इसमाकडे लोखंडी तलवार सापडल्याने त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
- शिवाजीनगर: गोकुळनगर भागात ०३ जणांवर कारवाई. तसेच क्लासेस एरियामध्ये एकाकडे खंजीर मिळून आल्याने त्याच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
- दामिनी पथकाची कामगिरी: दामिनी पथकाने भाग्यनगर रोड, वर्कशॉप रोड, विशावा गार्डन आणि शामनगर परिसरात आरडाओरड करणाऱ्या १३ इसमांवर कारवाई केली.
नियम मोडणाऱ्यांना कडक इशारा
या सर्व ३१ जणांवर म.पो. कायदा कलम ११०/११७ प्रमाणे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आवाहन केले आहे की, कुणीही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करू नये किंवा मद्यपींना जागा उपलब्ध करून देऊ नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.












